लोकमत न्यूज नेटवर्क, माणगाव : विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नाहीत तोवरच रायगडमध्ये महायुतीत उमेदवारीवरून मिठाचा खडा पडला आहे. कर्जतमध्ये राष्ट्रवादीने उमेदवाराची घोषणा केल्याने मित्रपक्ष शिंदेसेनेत नाराजी वाढली आहे. गोरगाव येथील एका कार्यक्रमात आमदार महेंद्र थोरवे यांनी ‘युतीधर्म पाळा, नाहीतर श्रीवर्धनला उमेदवार देऊ,’ असा इशाराच तटकरे यांना दिला आहे.
यावेळी आमदार गोगावले यांनी कर्जत येथे राष्ट्रवादीचा उमेदवार घोषित झाल्याने वाद निर्माण झाला आहे. आठ दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला जाईल, असे सांगितले. लोकसभा निवडणुकीत रायगडच्या जागेवरून शेवटपर्यंत वाद होता. तटकरे यांनी मीच उमेदवार, असे अगोदरच जाहीर केल्याने मित्रपक्ष नाराज होते.
पाठीत वार करायला सुरुवात
यावेळी आमदार थाेरवे यांनी, ‘आपण लोकसभेला युतीचा धर्म पाळला. राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना निवडूनदेखील आणले; पण कर्जतमध्ये राष्ट्रवादीचा विधानसभेचा उमेदवार घोषित झाला. राष्ट्रवादीचे हात दगडाखाली निघून गेल्यावर त्यांनी पाठीत वार करायला सुरुवात केली आहे. युतीचा धर्म पाळा, नाहीतर श्रीवर्धनमध्ये प्रमोद घोसाळकर यांची उमेदवारी घोषित करू,’ असा इशारा यावेळी दिला. रविवारी शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांचा वाढदिवस होता. यावेळी आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण चाळके, प्रवक्ते राजीव साबळे व नितीन पावले, जिल्हा महिला संघटक नीलिमा घोसाळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.