नियम पाळल्यास अपघात कमी होतील; संजय भालेराव यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:20 PM2020-01-13T23:20:07+5:302020-01-13T23:20:28+5:30
कर्जत आगाराचा वाहतूक रस्ते सुरक्षितता पंधरवडा
कर्जत : दरवर्षीप्रमाणे यंदाही ११ ते २५ जानेवारी या कालावधीत प्रवासी सुरक्षितता मोहीम राबवित आहोत. सुरक्षेशी निगडित असलेल्या सर्व सूचनांची काटेकोर अंमलबजावणी या काळात करायची आहे. बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी, तसेच वाहतूक नियमांचे पालन, उत्तम शरीर प्रकृती आणि मनस्वास्थ ही महत्त्वाची चतु:सूत्री चालकांनी ध्यानात ठेवल्यास अपघाताचे प्रमाण निश्चितच कमी होईल, असे मार्गदर्शन नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी आगारातील कर्मचाऱ्यांना केले. ते कर्जत आगाराच्या वाहतूक रस्ते सुरक्षितता पंधरवडा अभियानाप्रसंगी बोलत होते.
कर्जत आगाराच्या वाहतूक सुरक्षितता मोहिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन आगाराच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी नायब तहसीलदार संजय भालेराव व आगार प्रमुख शंकर यादव यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सूत्रसंचालन दीपक देशमुख यांनी केले. आगाराचे प्रमुख शंकर यादव यांनी प्रवासी आणि एसटी यांच्यातील विश्वास आणि नाते बळकट करण्यासाठी सुरक्षित प्रवासाची हमी देणाºया चालकाशिवाय दुसरा चांगला दुवा असू शकत नाही, असे सांगितले. यावेळी लेखाकार अंकुश राठोड, सहायक वाहतूक निरीक्षक देवानंद मोरे, एल. के. कुंभार, नागेश भरकले, कृष्णा शिंदे, एच.आर.छत्तीसक आदी कर्मचारी उपस्थित होते.