विविध स्थानकांवर रेल्वे गाड्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना जिल्हा प्रशासनाकडून खाद्य पदार्थ
By निखिल म्हात्रे | Published: October 1, 2023 08:54 PM2023-10-01T20:54:11+5:302023-10-01T20:54:36+5:30
यावेळी जिल्हा प्रशासन, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रवाशांना मदत करीत खाद्यपदार्थांची पाकिटे, पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या.
निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग - पनवेल कळंबोली येथे रेल्वे मालगाडी घसरल्याने लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासी गाड्यांचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रायगड जिल्ह्यातील विविध स्थानकांवर रेल्वे गाड्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना खाद्य पदार्थ व आवश्यक सोयी पुरविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी दिलेल्या निर्देशानुसार संबंधित तालुक्यातील महसूल, पोलिस व शासकीय विभागांकडून तातडीने कार्यवाही करण्यात आलीे.
यावेळी जिल्हा प्रशासन, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रवाशांना मदत करीत खाद्यपदार्थांची पाकिटे, पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या. प्रवाशांना जेवण पाकिटे देण्यात आले. प्रवासी रेल्वे गाड्या आणि प्रवाशांना सुरक्षितता व सुविधा पोहोचवत मदत केली गेली. पेण रेल्वे स्टेशन येथे अंदाजे बाराशे प्रवासी होते या सर्वांकरिता पाणी, चहा , बिस्कीट, केळी, समोसे आणि वडापाव याची सोय करण्यात आली होती. तसेच खिचडी उपलब्ध करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्थेकरिता पोलीस अधिकारी उपस्थित होते.
कोलाड रेल्वे स्थानकातील गाडी क्रमांक -09017 मडगाव -उदाना एक्सप्रेस, रोहा-स्थानकातील गाडी क्रमांक 22653 टिव्हीसी-निजामुद्दीन एक्सप्रेस , स्थानकातील गाडी क्रमांक नागोठणे स्थानकातील गाडी क्रमांक 01186, कुडाळ पॅसेंजर या ३ ट्रेन स्टेशन वर उभ्या होत्या. प्रवासी यांची पाणी चहा नासता व्यवस्था करण्यात आली. अपघाताच्या ठिकाणी एक रेल्वे ट्रॅक वाहतुकी करिता रेल्वे प्रशासनाने सुरळीत केला आहे. पनवेल मध्ये कळंबोली व नावडे येथे गाडी क्रमांक 16337 एरणाकुलम एक्सप्रेस,गाडी क्रमांक 11003 सावंतवाडी दादर तुतारी एक्सप्रेस व गाडी क्रमांक, 12133 मंगळुरू एक्सप्रेस या तीन गाड्या थांबल्या होत्या.तसेच पनवेल स्थानकात एक हजार भोजन पॅकेट व पाण्याच्या बॉटल उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यापैकी एरणाकुलम व मंगळुरू एक्सप्रेस गाड्या डिझेल इंजिन जोडून पुढे रवाना करण्यात आल्या आहेत. यातील तुतारी एक्स्प्रेस, एर्नाकुलम -ओका एक्स्प्रेस, मंगलुरू एक्स्प्रेस या गाड्यांना अपघात ठिकाण ओलांडून रवाना करण्यात आले आहे. तसेच मुंबई कडे जाणारी मडगाव एक्स्प्रेस मार्गस्थ झाली आहे. तसेच महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्थानक येथे कोकण कन्या एक्सप्रेस व करंजवाडी रेल्वे स्थानकावर सावंतवाडी ते छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई एक्सप्रेस या गाड्या थांबल्या होत्या.