सावलीतील ग्रामस्थांना जेवणातून विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 11:44 PM2018-10-29T23:44:15+5:302018-10-29T23:44:34+5:30
अनेकांना उलट्या, मळमळ, चक्कर आणि जुलाबाचा त्रास
मुरु ड जंजिरा : मुरुड तालुक्यातील सावली गावातील काही ग्रामस्थ पिंडदान कार्य करण्यासाठी सावली येथून सकाळी हरिहरेश्वर येथे गेलेले होते. हरिहरेश्वरला जाताना त्यांनी चपाती व बटाट्याची भाजी हे जेवण सोबत घेतले होते. हरिहरेश्वरला कार्यक्रम आटोपल्यावर दुपारी जेवण करून सर्वजण सावली गावात येत होते. मात्र त्यावेळी अनेकांना उलट्या, मळमळ, चक्कर आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला.
जास्त त्रास जाणवू लागल्यामुळे काही जणांना मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. यापैकी ४ ते ५ जणांची प्रकृती जास्त खालावली होती. मात्र ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण बागुल, वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर गगलवार यांनी तत्परतेने उपचार केल्याने त्यांनी प्रकृती स्थिरावली.
विषबाधा झालेल्या १६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
तापमान वाढल्याने अन्न खराब झाले असावे आणि त्यामुळे विषबाधा झाल्याचा अंदाज प्रथमदर्शनी वर्तवण्यात येत आहे.