६१४ शाळांना सरकारकडून फुटबॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 02:38 AM2017-08-17T02:38:27+5:302017-08-17T02:38:29+5:30
सतरा वर्षांखालील फुटबॉल वर्ल्ड कपचा थरार भारतात होणार आहे. या वर्ल्ड कपचे प्रमोशन म्हणजे हा खेळ भारतातील युवकांनी खेळावा.
आविष्कार देसाई ।
अलिबाग : सतरा वर्षांखालील फुटबॉल वर्ल्ड कपचा थरार भारतात होणार आहे. या वर्ल्ड कपचे प्रमोशन म्हणजे हा खेळ भारतातील युवकांनी खेळावा. यासाठी महाराष्ट्रातील २० हजार शाळांना एक लाख फुटबॉल सरकार देणार आहे. रायगड जिल्ह्यातील ६१४ शाळांना तीन हजार ७० फुटबॉल प्राप्त होणार आहेत. एकीकडे राज्यातील पारंपरिक आणि आपल्याच मातीतील खेळांवर सरकारचे योग्य लक्ष नसल्याची झोड उठत असतानाचा आता सरकारने फुटबॉलवर मेहरनजर दाखवली असल्याचे बोलले जाते.
फिफा या संघटनेने ६ ते २८ आॅक्टोबर २०१७ या कालावधीमध्ये भारतात या खेळांच्या स्पर्धा भरवल्या आहेत. महाराष्ट्रात फक्त पाच सामने खेळवले जाणार आहेत. नवी मुंबई येथील डी.वाय.पाटील स्टेडियममवर या स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. १७ वर्षांखालील फुटबॉल वर्ल्ड कपबाबत वातावरण निर्माण व्हावे यासाठी सरकारने प्रत्येक शाळांना पाच फुटबॉल देण्याचे जाहीर केले आहे. राज्य सरकारच्या क्रीडा विभागाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शाळांची माहिती मागितली आहे. त्यामध्ये शाळांची संख्या, किती शाळांमध्ये मैदाने आहेत याची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.
रायगड जिल्ह्यातील ६१४ शाळांना प्रत्येकी पाच म्हणजेच तीन हजार ७० फुटबॉल देण्यात येणार आहेत. यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे क्रीडा अधिकारी राठी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याबाबतची उच्च स्तरीय बैठक २० आॅगस्ट रोजी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील आठ शाळांमध्ये खेळाची मैदाने आहेत. खालापूर तालुक्यात दोन, अलिबाग तालुक्यात एक, मुरु ड तालुक्यात एक, उरण तालुक्यात एक आणि रोहा तालुक्यात तीन अशी एकूण १६ मैदाने आहेत. राष्ट्रीय खेळांकडे सरकार पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नसल्याने ते खेळ लोप पावत आहेत, तर दुसरीकडे सरकार विदेशी खेळांना प्रमोट करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.