मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:32 PM2019-03-15T23:32:32+5:302019-03-15T23:32:54+5:30
निवडणूक विभागाकडून मुदतीबाबत संभ्रम; नोंदणीचा कालावधी स्पष्ट नसल्याने तक्रारी
- योगेश पिंगळे
नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतिम टप्प्यात निवडणूक यादीमध्ये नव्याने नाव नोंदविण्यासाठी मतदार निवडणूक कोकण भवन येथील कार्यालयात जात आहेत, परंतु अंतिम तारीख संपली असून नवीन नोंदणी बंद असल्याचे सांगण्यात येत असल्याने मतदारांच्या पदरी निराशा पडत आहे. यामुळे नाव नोंदणीच्या मुदतीबाबत नागरिकांमध्ये संभ्रम पसरला असून नाव नोंदणीच्या कालावधीची स्पष्टता नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्र म जाहीर केला आहे. नवी मुंबई शहरातील अनेक मतदारांनी मतदार यादीमध्ये नव्याने नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज भरले आहेत, परंतु यादीमध्ये अद्याप नावे समाविष्ट झालेली नाहीत. तसेच आॅनलाइन अर्ज भरताना अडचणी येत असल्याचे मतदारांचे म्हणणे आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदार फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रांसह थेट मतदान कार्यालयात धाव घेत आहेत. परंतु या ठिकाणी निवडणुका जाहीर झाल्या असून नाव नोंदणीची तारीख संपल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे मतदारांमध्ये नाराजी पसरत असून समाज माध्यमांमध्ये नोंदणी सुरू असल्याच्या बातम्या यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
१ जानेवारी २0१९ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरु ण मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून अनेक वेळा आॅफलाइन नोंदणी करूनही मतदार यादीमध्ये नावे समाविष्ट न झालेल्या नागरिकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवी मुंबई शहरातील मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु नोंदणी होत नसल्याने पुन्हा या मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे.
नोंदणी सुरू असल्याचा प्रशासनाचा दावा
नवीन मतदार नोंदणीसाठी आॅनलाइन आणि आॅफलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू असल्याचा दावा नायब तहसीलदार नाथजी सगट यांनी केला असून नव्याने नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना जुन्या ठिकाणी असलेले नाव कमी करण्याचा सल्ला दिला जात आहे.
नवीन नावाची नोंदणी करताना इतर ठिकाणच्या मतदार यादीमधील नाव असल्यास सदर नाव कमी करण्यासाठी देखील फॉर्म भरून घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
आॅनलाइन नोंदणी होत नसल्याने आॅफलाइन मतदार नोंदणीसाठी कोकण भवन येथील निवडणूक कार्यालयात अनेक नागरिक येत आहेत, परंतु नवीन नोंदणी बंद झाल्याचे सांगून नागरिकांना परत पाठविले जात आहे. याबाबत बराच वेळ वाद झाल्यावर नोंदणी बंद असल्याचे मी येथील अधिकाऱ्यांना लेखी मागितले त्यानंतर माझ्या नावाची नोंदणी करून घेतली. अधिकाºयांकडून मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रकार निवडणूक कार्यालयात घडत असून हे चुकीचे आहे.
- व्ही.टी.पवार, नागरिक सीवूड