नेरळ : कर्जत तालुक्यातील तेलंगवाडी येथील आदिवासी बांधव वाडवडिलांपासून भातशेती करत आहेत; परंतु ही जागा वनविभागाच्या ताब्यात आहे. या जागेत पूर्वीपासून आदिवासी बांधव भातशेती लावत आहेत; परंतु कोणतीही सूचना न देता लावलेली भातशेती पोलिसांनी आणि वनविभागाने उद्ध्वस्त केली असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर आदिवासी संघटना आणि श्रमजीवी संघटना आक्रमक झाली आहे.कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायत हद्दीत तेलंगवाडी आदिवासीवाडी असून, येथील शेतकरी पूर्वीपासून भातशेती करत असतात; परंतु ते कसत असलेली जमीन ही वनविभागाच्या ताब्यात आहे. दरवर्षी आदिवासी बांधव तिथे भाताचे पीक घेत असतात; परंतु यावर्षी लावलेली भातशेती वनविभाग आणि पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना, नोटीस न देता भाताचे पीक मशिनने कापून आणि हातानेउद्ध्वस्त केले आहे. तसेच येथील आदिवासी बांधवांना पोलिसांनी दमदाटी केल्याचा आरोप केला आहे.निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा- या सर्व प्रकारचा आदिवासी बांधवांनी निषेध केला असून आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. आदिवासी समाजावर झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी, अन्याय दूर करण्यासाठी श्रमजीवी संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने सोमवारी कर्जत प्रांत कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे. यात आचारसंहितेचा भंग झाल्यास हे वन अधिकारी आणि पोलीस जबाबदार राहतील, असा इशारा आदिवासी बांधवांनी दिला आहे. तसेच आमच्या शेतीच्या नुकसानीची भरपाई त्वरित न दिल्यास आम्ही सर्व आदिवासी बांधव मतदानावर बहिष्कार टाकू, असा इशाराही आदिवासी बांधवांनी दिला आहे.तेलंगवाडी येथे वाडवडिलांपासून आम्ही भातशेती करत आहोत. ती जागा वनविभागच्या अखत्यारित येते; परंतु शेती लावण्याच्या अगोदर जर सूचना दिली असती तर शेती लावली नसती. पीक तयार झाल्यानंतर वनविभाग आणि पोलिसांनी ही भातशेती उद्ध्वस्त केली असल्याने आमच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या संदर्भात आम्ही पोलीस आणि वनविभागाच्या विरोधात आंदोलन करणार आहोत.- जानू मोतीराम पादीर, शेतकरी, तेलंगवाडीवनविभागाने अतिक्रमण काढण्यासंदर्भात लेखी पोलीस स्टेशनला कळविले होते, त्यानुसार बंदोबस्त देण्यात आला होता. भातशेती काढून टाकण्याची कारवाई वनविभागाने केली आहे.- केतन सांगळे, पोलीस उपनिरीक्षक, नेरळतेलंगवाडी हद्दीत ३३ कोटी वृक्ष अंतर्गत १३ हजार रोपांची लागवड केली आहे. त्या लागवडीमध्ये आदिवासींनी भात लागवड केली आहे. या संदर्भात त्यांना अनेक वेळा सूचना केल्या होत्या. वन हक्क कायद्यांतर्गत तक्रारी किंवा दावा दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. मंजुरीसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवून देऊ, असेदेखील सांगण्यात आले होते; परंतु तसे काही त्यांनी केले नाही. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.- जे. एम. सुपे, वनपाल, बोरगाव
तेलंगवाडीत भातशेतीवर वनविभागाची कारवाई! आदिवासी, श्रमजीवी संघटना करणार आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 11:43 PM