खैराच्या अवैध वाहतुकीवर वन विभागाची कारवाई
By admin | Published: February 17, 2017 02:16 AM2017-02-17T02:16:08+5:302017-02-17T02:16:08+5:30
महाड तालुक्यात सुरू असलेली बेकायदा जंगलतोड अवैध कोळसा व लाकूड वाहतुकीबाबत वनविभागाने गंभीर दखल घेतली
महाड : महाड तालुक्यात सुरू असलेली बेकायदा जंगलतोड अवैध कोळसा व लाकूड वाहतुकीबाबत वनविभागाने गंभीर दखल घेतली असून, गुरुवारी सकाळी वडघर येथे खैराची अवैध वाहतूक करणारे वाहन वनक्षेत्रपालांनी अडवून कारवाई केली. वनक्षेत्रपाल के. वाय. पाथरवट, वनपाल एस. सी. गुजर, ए. बी. झावरे यांनी ही कारवाई केली.
बेकायदा जंगलतोड खैराची वाहतूक, तसेच कोळसा उत्पादन करणाऱ्या जंगलतस्कारांनी महाड तालुक्यात अक्षरश: उच्छाद मांडला आहे. याबाबत वनविभागाकडून कुठलीही कारवाई केली जात नव्हती. महाड-रायगड मार्गावर वनविभागाचे कर्मचारी गस्त घालताना कोहर गावाजवळ तीन हजार रुपयांचा अवैध कोळसासाठा जप्त केला. तर भावे किये मार्गावर जंगलतोड केलेला मोठा साठा या पथकाने जप्त केला, तर बुुधवारी कोथुर्डे रस्त्यालगतही चार हजार रुपये किमतीचा कोळशाचा साठा गस्त पथकाने जप्त करून जीपही जप्त केली.
वनविभागाच्या या धडक कारवाईमुळे महाड तालुक्यात अवैध जंगलतोड करून कोळसा उत्पादन करणाऱ्यांचे तसेच बेकायदा लाकडाची वाहतूक क रणाऱ्या जंगलतस्करांचे धाबे दणाणले आहेत. या बेसुमार जंगलतोडीमुळे तालुक्यातील पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून जंगलतस्करांसाठी वनविभागाचे अधिकारी यांचे अंतर्गत साटेलोटे असल्याने त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्याचे साहस वनविभागाकडून होत नव्हते. मात्र, या अवैध जंगलतोडीबाबत पर्यावरणप्रेमींनी वरिष्ठ वन अधिकाऱ्याकडे तक्र ारी केल्यानंतर मात्र महाड वनविभाग कार्यालय जागे झाले असून त्यांनी हा कारवाईचा बडगा उगारल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)