कांता हाबळेनेरळ : वनविभाग काही वर्षे वृक्ष लागवडीवर भर देत असून यावर्षी नेरळ वनविभाग एक लाख झाडांची लागवड करणार आहे. त्यासाठी जुम्मापट्टी येथे रोपवाटिकेमध्ये रोपांची निर्मिती केली असून ४० हजार रोपे सध्या तेथे तयार आहेत, त्याच वेळी अन्य ठिकाणावरून रोपे मागविली जाणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल नारायण राठोड यांनी दिली.
नेरळ वनविभागामध्ये माथेरानच्या परिसराचा देखील समावेश असून नेरळ परिसरात झाडे लावण्यासाठी वनविभाग दरवर्षी उन्हाळ्यात नियोजन करीत असते. पावसाळा सुरू झाल्यानंतर झाडे लावण्यासाठी नेरळ, बेडीसगाव, माणगाव, शेलू, दामत या ठिकाणी तब्बल एक लाख खड्डे खोदून झाले आहेत.
दामत आणि शेलू येथ प्रामुख्याने सागाच्या झाडांची लागवड करण्यात येणार असून नेरळ, बेडीसगाव आणि माणगाव येथे मिश्र स्वरुपातील झाडांची लागवड केली जाणार आहे. मिश्र जातीच्या झाडांची लागवड करताना करंज, शिवण, कांचन, बेहडा, चिंच, आवळा आदी झाडांची लागवड केली जाणार आहे. झाडे लावण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम वन विभागाच्या माध्यमातून वन मजूर, वन संरक्षण समितीचे सदस्य यांनी केले आहे.
वनविभागाच्या जुम्मापट्टी येथे रोपवाटिका निर्माण केली असून त्या ठिकाणी रोपांची निर्मिती केली जात आहे. गेल्या चार महिन्यापासून वन मजूर हे रोपांची निर्मिती करीत असून रोपांची लागवड बरोबर होते किंवा नाही याची माहिती वनपाल दत्तात्रेय निर्गुडा घेत आहेत.जुम्मापट्टी येथील नर्सरीमध्ये वन विभागाने ४० हजार रोपांची निर्मिती केली आहे. नेरळ वन क्षेत्रात एक लाखाहून अधिक झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असता नेरळ जुम्मापट्टी येथील नर्सरीत तयार झालेली रोपांची संख्या लक्षात घेता सागाची कमी पडणारी रोपे वन विभागाने पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे तयार केली आहेत. ती रोपे पावसाळा सुरू झाल्यानंतर नेरळ येथे आणली जाणार आहेत. जुलै महिन्यात वन विभागाच्या वन महोत्सवात त्या सर्व एक लाख झाडांची लागवड केली जाईल अशी माहिती नेरळ वनविभागाचे प्रभारी अधिकारी नारायण राठोड यांनी दिली आहे.
सध्या नेरळ जुम्मापट्टी येथे असलेल्या नर्सरीमध्ये ४० हजार झाडे तयार असून ती सर्व झाडे जुलै महिन्यात लावली जाणार आहेत. अजून ही मोठी रोपे त्या ठिकाणी तयार होतील आणि मोठी रोपे लावल्याने त्यांची वाढ लगेच होते हे लक्षात घेऊन आम्ही जानेवारी महिन्यात रोपवाटिकेचे काम सुरू केले होते. - नारायण राठोड, वनक्षेत्रपाल,नेरळ, माथेरान वनविभाग