भावी शिक्षकांनी बांधला वनराई बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 05:03 AM2018-12-21T05:03:26+5:302018-12-21T05:03:42+5:30
समाजसेवा शिबिर : स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन; जनजागृतीसाठी दिंडीचे आयोजन
कर्जत : नेरळजवळील दहिवली येथे असलेल्या प्राध्यापक महाविद्यालयात शिकणाऱ्या भावी शिक्षक आणि प्राध्यापक यांचे निवासी श्रमसंस्कार शिबिर वांगणी येथे पार पडले. या वेळी विद्यार्थ्यांनी ढवळेपाडा नाल्यावर पाणी अडविण्यासाठी वनराई बंधारा बांधला.
कर्जत तालुक्यातील नेरळ येथील नवजीवन बी. एड. महाविद्यालयाचे नेरळचे शैक्षणिक वर्ष समाजसेवा शिबिर वांगणी आणि कुडसावरे ग्रामपंचायत तसेच आणि रामदास सेवा आश्रम वांगणी यांच्या संयुक्त विद्यमाने वांगणी येथे आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन रामदास सेवा आश्रमाचे प्रमुख पराग रामदासी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
पाच दिवसीय निवासी शिबिरात विद्यार्थ्यांनी स्वच्छता, श्रमदान, कुटुंब सर्वेक्षण आदी प्रकल्प हाती घेऊन पूर्ण केले तसेच जनजागृती दिंडी काढली. विद्यार्थ्यांसाठी डॉ. प्रतीक्षा गायकवाड यांचे आरोग्यविषयक तसेच बदलापूर ग्रामीण पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी जागरूक नागरिक आणि स्पर्धा परीक्षा याबाबत मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. भावी शिक्षक आणि प्राध्यापक यांनी ढवळेपाडा ओहोळावर श्रमदान करून वनराई बंधारा बांधला. शिबिराचे समारोपप्रसंगी ढवळे ग्रामपंचायत सरपंच अलका बेलवकर, रामदास सेवा मठाचे पराग रामदासी तसेच रमेश कुंभार, प्राचार्य ज्ञानेश्वर मगर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.