PM मोदींची काल शरद पवारांवर टीका, आज उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; राज्य सरकारवरही निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 07:48 PM2023-10-27T19:48:39+5:302023-10-27T19:57:10+5:30

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारवर टीका केली आहे

Former CM Uddhav Thackeray has criticized Prime Minister Narendra Modi and the state government | PM मोदींची काल शरद पवारांवर टीका, आज उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; राज्य सरकारवरही निशाणा

PM मोदींची काल शरद पवारांवर टीका, आज उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; राज्य सरकारवरही निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. मात्र काल त्यांनी हा आरोप केला नाही. कारण त्याच्यासोबत काल स्टेजवर कोणीतरी बसलं होतं. राज्यातील जनता जे काही सुरु आहे, ते पाहत असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. जे गुन्हेगार आहेत, गद्दार आहेत त्यांना टकमक टोकावर जायची वेळ आली आहे, असा निशाणा देखील उद्धव ठाकरेंनी साधला. 

७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी शरद पवारांनीच केली होती, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. तसेच किती सुडाचं राजकारण कराल परंतु एक दिवस महात्मा फुलेंच्या शेतकऱ्याचा आसूड निघाला की, या माजलेल्या सत्ताधाऱ्यांना जागेवर आणता येईल, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. आज रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड स्थलांतरीत श्रीवर्धन शाखेचा  शुभारंभ सोहळा आज पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंसह शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण देखील उपस्थित होते. 

दरम्यान, देशाचे कृषिमंत्री राहिलेल्या महाराष्ट्रातील नेत्याने शेतकऱ्यांसाठी काय केले? काही लोकांनी शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण केले. आपल्या सात वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी केवळ साडेतीन लाख कोटींचे धान्य आधारभूत किमतीवर खरेदी केले. आम्ही एवढ्याच वर्षांत साडेतेरा लाख कोटींची खरेदी करून शेतकऱ्यांना पैसे दिले, अशी तुलना करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले. 

अजित पवारांकडून नरेंद्र मोदींचे कौतुक-

गेल्या साडेनऊ ते दहा वर्षांची नरेंद्र मोदींची कारकीर्द बघितल्यास ते साईबाबांच्या सबका मालिक एक या मंत्राप्रमाणेच सबका साथ, सबका विकास या घोषणेनुसार देशाला पुढे नेत आहेत. ते सर्वांना पावलोपावली जाणवत असल्याचं अजित पवार म्हणाले. महाराष्ट्राने कायमच राष्ट्राचा विचार केला आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकटं आली, तेव्हा तेव्हा महाराष्ट्र छातीचा कोट करून राष्ट्राबरोबर उभा राहिला. यशवंतराव चव्हाण यांनी हीच भूमिका वारंवार मांडली होती. त्याच भूमिकेतून आज नरेंद्र मोदी हे राष्ट्र बळकट करण्याचं काम करत आहेत. याच कारणामुळे आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, असं अजित पवारांनी सांगितले. 

आम्ही विकासाचे आकडे सांगतो, २०१४ पूर्वी भ्रष्टाचाराचे आकडे होते-

देशाला गरिबीपासून मुक्ती मिळेल, गरिबीला पुढे जाण्याची संधी मिळेल हाच सामाजिक न्याय आहे. गरीब कल्याणासाठी सरकारचे बजेटही वाढतेय. महाराष्ट्रात १ कोटी १० लाख आयुष्यमान कार्ड दिलेत. या सर्व कार्डधारकांना ५ लाख रुपयांच्या मोफत उपचाराची हमी आहे. गरिबांना मोफत रेशनसाठी ४ लाख कोटींहून अधिक खर्च केलेत. गरिबांना घरे दिलीत. २०१४ च्या आधीच्या १० वर्षाच्या तुलनेत जास्त आहेत. नल ते जल योजनेत आतापर्यंत २ लाख कोटी खर्च झालेत. पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ कुटुंबांना मिळत आहे. मी इतके आकडे सांगतोय, २०१४ च्याआधीही तुम्ही आकडे ऐकत होता, पण किती लाख कोटींचा भ्रष्टाचार, घोटाळा हे होते. आता इतके लाख कोटींची विकासकामे, योजना असं आहे असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका केली.

Web Title: Former CM Uddhav Thackeray has criticized Prime Minister Narendra Modi and the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.