बिरवाडी : महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे नेते तथा माजी गृहराज्यमंत्री प्रभाकर मोरे यांचे त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा अमित, मुली, जावई, नातंवडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी महाड येथे रविवारी सकाळी होणार आहे.माजी मंत्री प्रभाकर मोरे यांनी महाड विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार व मंत्री म्हणून प्रतिनिधित्व करत ग्रामीण विकासाला चालना दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकासह महाड एमआयडीसीत पंचतारांकित उद्योग वसाहत निर्माण करून स्थानिकांच्या रोजगार निर्मितीसाठी मोठे काम केले.रायगड जिल्हा परिषद, महाड नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता स्थापन करण्यात त्यांचे योगदान होते. त्यांच्या जाण्याने महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा मार्गदर्शक नेता हरपला आहे. त्यांच्यामुळेच महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेना संघटना मजबूत होऊन सामान्य कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेपासून विधानसभेपर्यंत काम करण्याची संधी मिळाली, अशी प्रतिक्रिया महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांनी दिली.
माजी मंत्री प्रभाकर मोरे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 5:38 AM