गडसंवर्धन मोहीम प्रभावीपणे राबविणार, जयकुमार रावल यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 02:01 AM2019-02-12T02:01:27+5:302019-02-12T02:01:37+5:30
संपूर्ण महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र गडकिल्ले संवर्धन मोहीम प्रभावीपणे राबवणार असल्याची घोषणा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केली. छत्रपती संभाजी राजे यांच्या पुढाकारातून किल्ले रायगडावर सोमवारी आयोजित केलेल्या दुर्ग संवर्धन परिषदेत रावल बोलत होते.
महाड : संपूर्ण महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र गडकिल्ले संवर्धन मोहीम प्रभावीपणे राबवणार असल्याची घोषणा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केली. छत्रपती संभाजी राजे यांच्या पुढाकारातून किल्ले रायगडावर सोमवारी आयोजित केलेल्या दुर्ग संवर्धन परिषदेत रावल बोलत होते. राज्यातील ४५० किल्ल्यांंवर राज्य शासनातर्फे शंभर दिवस स्थानिक जनतेच्या सहकार्यातून ही मोहीम राबविण्यात येईल, असेही रावल यांनी स्पष्ट केले.
जोपर्यंत समाज जागृत होत नाही तोपर्यंत गडसंवर्धन करणे मोठे आव्हान आहे. गडसंवर्धन ही लोकचळवळ व्हायला हवी यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असे सांगताना गड संवर्धनाखेरीज गाइड प्रशिक्षण, वृक्ष लागवड आदी उपक्र म राबवले जातील, असे रावल यांनी सांगितले.
पाचाड येथील राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या समाधीचे सुशोभीकरण लवकरच केले जाईल, असे रावल यांनी जाहीर केले. रायगडची पुनर्बांधणी होऊ शकत नाही, मात्र या ऐतिहासिक बहुमोल ठेव्याचे जतन होऊ शकते. या गडावर आजही उत्खनन करताना शिवकालीन अवशेष सापडतात. रायगड विकासाच्या माध्यमातून रायगडाला शिवकालीन गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्राधिकरणाचा प्रामाणिक प्रयत्न राहील, असेही खा. संभाजीराजे यांनी या वेळी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे व माजी आमदार माणिक जगताप यांनी रायगड संवर्धन विकास योजना राबवताना परिसरातील २१ गावांच्या स्थानिकांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी केली.परिषदेला रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष खा. छत्रपती संभाजीराजे, राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज, वन विभागाचे मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक विभागाचे सचिव भूषण गगराणी आदी मान्यवर उपस्थित होते.