किल्ले रायगड ‘क’ पर्यटनक्षेत्र
By admin | Published: August 16, 2015 11:42 PM2015-08-16T23:42:16+5:302015-08-16T23:42:16+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांंच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ले रायगडावर भारत देशासह जगभरातून शिवप्रेमी व पर्यटक येत असतात. मात्र किल्ले रायगड अजूनही
बिरवाडी : छत्रपती शिवाजी महाराजांंच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ले रायगडावर भारत देशासह जगभरातून शिवप्रेमी व पर्यटक येत असतात. मात्र किल्ले रायगड अजूनही ‘क’ पर्यटनक्षेत्रात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, उरण या तालुक्यांतील गावे ‘ब’ पर्यटन क्षेत्रात येत असल्याची मंजुरी महाराष्ट्र शासनाने १९९६ साली दिली आहे. त्यानंतर २००५, २०१०, २०११ पर्यंत रायगड जिल्ह्यात ७५ पर्यटनक्षेत्र येत असल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागामार्फत महाड तालुक्यातील पाचाड, गांधारपाले, आंबेशिवथर, दासगाव, भेराव, पिंपळवाडी, बिरवाडी या ग्रामपंचायतींना रायगड जिल्हा पर्यटनस्थळ विकासकामे करण्याबाबत १७ जुलै २०१५ च्या पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. ग्रामपंचायत हद्दीतील पर्यटनस्थळांच्या यादीमध्ये किल्ले रायगडचा समावेश असून या पर्यटनस्थळांवर पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरविणे, अस्तित्वातील पाण्याच्या सुविधांचे नूतनीकरण करणे अशा विषयांचे प्रस्ताव या कार्यालयामार्फत करण्यात येणार आहेत.
ही योजना पूर्ण करून दिल्यानंतर योजनेतील देखभाल दुरुस्ती करण्याबाबतचे ठराव ग्रामसभेच्या मासिक सभेच्या विहित नमुन्यात उपविभागाकडे पाठविण्यात यावेत. हे ठराव प्राप्त झाल्यानंतरच पर्यटनस्थळावरून पिण्याच्या पाण्याची सुविधा देण्याबाबतचा प्रस्ताव उपविभागामार्फत तयार केला जाईल. हे ठराव या कार्यालयास प्राप्त न झाल्यास पर्यटनस्थळी पाणीपुरवठा न मिळाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नसल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे उपविभाग महाड यांच्यामार्फत सूचित केले आहे. या यादीमध्ये किल्ले रायगडसह महाड शहर बिरवाडी ग्रामपंचायतीमधील श्री देव बहिरी मंदिर, पोलादपूर तालुक्यातील कांगोरीगड, उमरठ, सूर्याजी मालुसरेंची समाधी, महाड गांधारपाले येथील कोरीव लेणी, शिवथर घळई या सर्व पर्यटनस्थळांचा ‘क’ गटामध्ये समावेश आहे. (वार्ताहर)