नागोठणे : ऐनघर ग्रामपंचायतीची निवडणूक २८ आॅक्टोबरला होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत सदस्यांच्या संख्येत दोनने वाढ होत आता पंधरा सदस्य निवडून येणार आहेत. या ग्रामपंचायत हद्दीत ऐनघरसह सुकेळी, कानसई, हेदवली, तामसोली आणि बाळसई ही गावे तसेच तेरा आदिवासीवाड्या मोडतात. भौगोलिकदृष्ट्या आठ चौरस कि.मीटरचा विस्तार असलेल्या या ग्रामपंचायतीमधील मतदारांची संख्या साधारणत: साडेचार हजार इतकी आहे. हद्दीत जिंदाल उद्योग समूहाचे चार कारखाने येत असल्याने करांच्या माध्यमातून लाखो रु पयांचे उत्पन्न या ग्रामपंचायतीला मिळत असते व त्यामुळेच सर्वच राजकीय पक्ष ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी कायम इच्छुक असतात. निवडणुकीत प्रभाग क्र मांक दोनमध्ये शेकापचे विद्यमान सरपंच महादेव मोहिते आणि काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनोहर सुटे यांच्यात लक्षवेधी लढत आहे. या प्रभागात जिंदाल उद्योग समूहाच्या निवासी संकुलातील मतदार येत असून विशेष म्हणजे येथे असणारे सर्वच्या सर्व म्हणजेच ६४९ मतदार बिगर मराठी आहेत. प्रभागात तीन जागांसाठी नऊ उमेदवार असल्याने तिरंगी लढत असली तरी आमचीच स्थिती मजबूत असल्याचा दावा काँग्रेस आघाडीचे उमेदवार मनोहर सुटे यांनी केला आहे. पंधरा जागांसाठी चाळीस उमेदवार रिंगणात आहेत.सरपंचपद यावेळी अनुसूचित जाती-जमाती वर्गासाठी राखीव असून पंधरामध्ये दोन जागा त्यासाठी राखीव आहेत. बंडखोरी झाली असल्याने बहुतांशी ठिकाणी तिरंगी लढती आहेत. या प्रभागात सर्वात जास्त मतदारांची संख्या आहे. ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या मजबूत असल्याने ती ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शेकाप-सेना अशा आघाड्या झाल्या असल्या, तरी बंडखोरीचे ग्रहण काही ठिकाणी लागले आहे . (वार्ताहर)
पंधरा जागांसाठी चाळीस उमेदवार
By admin | Published: October 27, 2015 12:28 AM