श्रीवर्धनमधील जसवलीत आढळली मगर, दोन तासाच्या थरारानंतर मगर पकडण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:48 PM2019-05-30T23:48:59+5:302019-05-30T23:49:13+5:30
जसवली गावाशेजारी रानवली धरण व जसवली तलाव ही दोन पाण्याची ठिकाणे आहेत. मात्र, यापूर्वी या ठिकाणी कधीही मगर आढळली नाही.
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील जसवली येथील रुग्णालय परिसरात बुधवारी रात्री ९ च्या सुमारास मगर दिसल्याने एकच खळबळ उडाली. एक दीड तासाच्या झटापटीनंतर मगरीला पकडण्यात प्राणिमित्रांना यश आले. मात्र, ही मगर या ठिकाणी आली कशी? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
जसवली गावाशेजारी रानवली धरण व जसवली तलाव ही दोन पाण्याची ठिकाणे आहेत. मात्र, यापूर्वी या ठिकाणी कधीही मगर आढळली नाही. महाड तालुक्यातील सावित्री नदीच्या पात्रात मगरीचा संचार असल्याचे दिसून आले आहे. जसवली तलावातील पाणी आटल्याने व अधिक उष्णतेमुळे तलावातील मगरीने स्थलांतर केल्याचे वनविभागाकडून बोलले जाते.
महाड शहराला सावित्री, गांधारी व काळ या तीन नद्यांनी वेढले आहे. गेल्या काही वर्षांत सावित्री नदीतील मगरींचा संचार पाहणे हा पर्यटकांसाठी टुरिस्ट पॉइंट ठरला आहे. जसवली गावालगत असणाऱ्या शासकीय रुग्णालय परिसरात ७ फूट ३ इंच लांबीची व अंदाजे ९० किलो वजनाची मगर सापडली. याची माहिती मिळताच प्राणिमित्र विशाल नागवेकर, अनिरुद्ध नागवेकर, प्रसाद अदावडे व व ग्रामस्थांच्या मदतीने मगरीला पकडण्यात आल्यावर त्याची माहिती श्रीवर्धन वनविभागाला देण्यात आली. श्रीवर्धन वनविभागाचे वनपाल आर. जी. गायकवाड, वनपाल सी. एस. मगर, वनरक्षक पी. डी. गजेवार, वनरक्षक ए. यू. नागरगोजे, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मगर ताब्यात घेऊन महाड खाडीमध्ये सोडली.
जसवलीतील रुग्णालय परिसरात मगर आढळल्यावर प्राणिमित्रांनी धाव घेतली. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर तिला वनविभागाकडे सोपवण्यात आले. अखेर सावित्रीच्या नदीपात्रात तिला सोडण्यात आले.