खैरे धरणाच्या दुरु स्तीचा मुहूर्त सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 02:52 AM2018-11-14T02:52:24+5:302018-11-14T02:52:43+5:30
डिसेंबरपासून धरणातील पाणीपुरवठा बंद : महाड तालुक्यातील १९ गावे, २९ वाड्यांतील ११ हजार ग्रामस्थांना बसणार टंचाईची झळ
सिकंदर अनवारे
दासगाव : महाड तालुक्यातील खैरे धरणाला गेल्या अनेक वर्षांपासून गळती आहे. शिवाय येथील जलशुद्धीकरण यंत्रणाही कालबाह्य झाल्याने दुरुस्तीची गरज आहे. लवकरच धरणाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असून, त्यासाठी धरणातून केला जाणारा पाणीपुरवठा डिसेंबरपासून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेवर अवलंबून असलेली १९ गावे व २९ वाड्यांतील ११ हजार ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील खैरे धरणाला गेली अनेक वर्षे गळती लागली होती. शिवाय, या धरणातून पाणीपुरवठा होत असलेली यंत्रणाही नादुरु स्त झाली आहे. यामुळे ऐनपावसाळ्यात परिसरातील नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत होता.
गळतीमुळे पाणी वाया जातेच, शिवाय वेळेत दुरुस्ती न झाल्यास संपूर्ण धरणालाच धोका निर्माण झाला होता. २१० मीटर लांबीच्या धरणातील १२० मीटर भाग नादुरुस्त झाला आहे. लघु पाटबंधारे विभागाकडून धरणाची दुरुस्ती केली जाणार आहे. दुरुस्तीसाठी धरणातील पाणी सोडावे लागणार आहे. त्यानंतरच ही दुरुस्ती शक्य होणार आहे.
धरणातील पाण्यावर सिंचन क्षेत्र कमी असले तरी १९ गावे व २९ वाड्यांतील ११ हजार ग्रामस्थांना याच धरणातून पाणीपुरवठा होतो. हा पाणीपुरवठा बंद झाल्यास येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. लघुपाटबंधारे विभागाने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला याबाबत पत्रव्यवहार करून पूर्वसूचना दिली आहे.
धरण पाटबंधारे विभागाचे असून, त्यावरील पाणीयोजना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या आहेत. पाण्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या ग्रामपंचायतींना पाण्याचे स्रोत माहिती देण्याबाबत लेखी कळविले आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत लोकसंख्या व गुरांची संख्या याची माहिती तत्काळ मागितली आहे. याआधारे या दोन्ही विभागांना पाण्यासाठी पुढील नियोजन करणे सोपे होणार आहे. धरणातून सोडले जाणारे पाणी अन्यत्र अडवून पाण्याचे नियोजन करता येईल का, याचाही विचार केला जात आहे.
खाडीपट्टा विभागात खैरे गावाजवळ हे धरण बांधण्यात आले आहे. धरणात केल्या जाणाऱ्या पाणीसाठ्याचा वापर सिंचनासाठी केला जाणार होता. मात्र, या भागातील शेती प्रदूषित पाण्याने बाधित झाल्याने अनेकांनी शेतीकडे पाठ फिरवली, यामुळे या पाण्याचा वापर आता पिण्याच्या पाण्यासाठी केला जात आहे. धरणात जवळपास १.७९ द.ल.घ.मी इतका पाणी साठा आहे. गोमेंडी, वराठी, चिंभावे, चिंभावे मोहल्ला, सुतारकोंड, बेबलघर, तेलंगे, तेलंगे मोहल्ला, ओवळे, आदिस्ते, खैरे तर्फे तुडील, वलंग. रोहन, जुई, कुंबळे, रावढळ, कोसबी, लोअर तुडील व वामने या गावांना या धरणातून पाणीपुरवठा होत आहे. धरणातून दररोज सहा लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो.
धरणा परिसरातील १२० मीटर लांब व १२ मीटर खोल क्षेत्रात गळती असल्याने देखभाल दुरुस्तीचे काम करणे आवश्यक आहे. याचा फायदा भविष्यात ग्रामस्थांनाच होईल.
- प्रकाश पोळ, शाखा अभियंता,
ल.पा. विभाग, महाड
धरणाच्या दुरुस्तीमुळे अनेक गावांचा पाणीपुरवठा बंद होणार असल्याबाबतची माहिती ग्रामपंचायतींना दिली आहे. येथील नियोजनाची माहितीही मागविण्यात आली आहे.
- जे. एन. पाटील, उपअभियंता,
ग्रा.पा. पुरवठा विभाग, महाड
धरणाच्या पाण्यावर आम्ही भाजीपाला करतो, पाणी बंद झाल्यास शेतीला पाणी मिळणार नाही आणि पीक आले नाही तर उपासमार होईल.
- सुनील साळवी, ग्रामस्थ