अलिबाग : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या जिल्हा नियोजन भवनाचे उद्घाटन १५ जून रोजी दुपारी ३ वाजता पार पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कामामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहणार नसले तरी ई-डिजिटल पद्धतीने त्यांचा सहभाग कार्यक्रमस्थळी राहणार आहे. नियोजन भवनचे उद्घाटन बऱ्याच कालावधीपासून रखडले होते. प्रशासनाला एकदाचा मुहूर्त सापडला आहे.
जिल्हा नियोजन समितीचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये होते. नियोजन विभागाला स्वतंत्र इमारत असावी यासाठी २०१२-१३ मध्ये नव्याने इमारत उभारण्याला गती आली. सुमारे आठ कोटी रुपये खर्चून सुसज्ज इमारत बांधण्यात आली होती. सहा महिन्यांपूर्वीच इमारत बांधून पूर्ण झाली होती, मात्र उद्घाटनाला मुहूर्त सापडत नव्हता. लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी नियोजन अधिकारी कार्यालय नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये सुमारे तीन महिन्यांपूर्वीच स्थलांतरित करण्यात आले आहे. आता केवळ औपचारिकता म्हणून उद्घाटन केले जाणार असल्याचे बोलले जाते. या कार्यक्रमाला राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे यांच्यासह सर्व आमदारांची उपस्थिती राहणार आहे.च्सुमारे आठ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेली इमारत सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत होती.