मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गाड्यांमधील डिझेल चाेरणारी टोळी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 02:04 PM2019-01-17T14:04:53+5:302019-01-17T14:19:36+5:30
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत थांबणार्या गाडयांमधील डिझेल शिताफीने चोरणारे तीन सराईत गुन्हेगार आणि चोरीचे डिझेल विकत घेणारा गोवंडी (मुंबई) येथील व्यावसायिक अशा चार आराेपींच्या टाेळीला जेरबंद करण्यात आले आहे.
जयंत धुळप
अलिबाग - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत थांबणार्या गाडयांमधील डिझेल शिताफीने चोरणारे तीन सराईत गुन्हेगार आणि चोरीचे डिझेल विकत घेणारा गोवंडी (मुंबई) येथील व्यावसायिक अशा चार आराेपींच्या टाेळीला जेरबंद करण्यात आले आहे. रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने बुधवारी हे यश मिळविले आहे.
4०० लिटर डिझेल पैकी 325 लिटर डिझेल हस्तगत
अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये संदिप लालजी बिंद (28), नरेश सुरेश गुजर (28), विशाल दिलीप ठाकूर (22) आणि चोरीचे डिझेल स्विकारणारा फैजुल्लाह ऐहसानुल्लाह खान (34) यांचा समावेश आहे. फैजुल्लाह ऐहसानुल्लाह खान यास अटक करून त्यांच्या कडून गुन्ह्यातील एकूण 4०० लिटर डिझेल पैकी एकूण 325 लिटर डिझेल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पनवेल, वाशी,संगमनेर, मुलुंडमध्ये डिझेल चोरी केल्याची कबूली
अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरूध्द अनेक पोलीस ठाण्यांमध्ये अशाप्रकारे चोरीचे व इतर गुन्हे दाखल असून त्यांनी पनवेल, वाशी,संगमनेर, मुलुंड या परिसरात डिझेल चोरी केल्याची कबुली दिली आहे.
कार मालकांनी दाखल केल्या होत्या तक्रारी
खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत द्रुतगती महामार्गावर थांबलो असताना गाडीतील डिझेची चोरी झाल्याबाबत 12 नोव्हेंबर व 23 नोव्हेंबर 2018 रोजी वेगवेगळ्य़ा गाडी मालकांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानुसार खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर आणि अपर पोलीस अधीक्षक सचीन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनानुसार रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे.एच.शेख व सपोनि डि.जी.पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.