चौपदरीकरणाने पुसली गावाची ओळख
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 11:25 PM2018-12-03T23:25:49+5:302018-12-03T23:25:58+5:30
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात पेण तालुक्यातील गडब गावाची ओळखच पुसली गेली आहे.
- प्रदीप मोकल
वडखळ : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात पेण तालुक्यातील गडब गावाची ओळखच पुसली गेली आहे. सध्या येथील ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर सुमारे दहा हजारांची लोकसंख्या असलेले गडब गाव वसले आहे. महसूल व सरकार दरबारी या गावाचे नाव काराव आहे. या ठिकाणी पाच पाडे आहेत. जांभेळा, चिर्बी, घाट, मांचेळा, मौजे या पाड्याचे मिळून झालेल्या गडब गावाच्या वेशीवर हनुमान मंदिर व त्याच्या बाजूला दगडी शाळा होती. मात्र महामार्गाच्या चौपदरीकरणात या वास्तूच नेस्तनाबूत झाल्याने गावाची ओळखच पुसली गेली आहे. येथील हनुमान जयंतीचा उत्सव तालुक्यात प्रसिध्द आहे. जांभेळा, चिर्बी, घाट, मांचेळा, मौजे येथील ग्रामस्थ दर पाच वर्षांनी आळीपाळीने हा उत्सव साजरा करीत. मात्र चौपदरीकरणात मंदिर तसेच समोरील अंगण गेल्याने उत्सव साजरा करताना अडचण निर्माण होणार आहे. तर गोपाळ काल्याला मंदिराचे प्रांगणातच श्रीकृष्ण लीला सादर केली जायची. अनेक कलाकारांना कला सादर करण्यासाठी हे हक्काचे व्यासपीठ होते. येथील नृसिंह सरस्वती महाराज मंदिर देखील महामार्गाच्या चौपदरीकरणात नेस्तनाबूत झाले आहे. या ठिकाणी अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्र म केले जायचे, मनोरुग्णावर उपचारही केले जायचे. दगडी शाळेचे विस्तारीकरण करण्यात आले होते. यात व्यायामशाळाही सुरू करण्यात आली होती. ही शाळाही जमीनदोस्त करण्यात आली आहे.
>पाण्याची समस्या बिकट
चौपदरीकरणात येथील तीन विहिरीही बुजवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाण्याची समस्या बिकट होण्याची शक्यता आहे. गडब गावाला जेएसडब्लू कंपनीतून पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी जर कंपनीतून पाइपलाइनद्वारे पाणी सोडले नाही तर विहिरीतील पाणी ग्रामस्थांना मिळत होते, परंतु आता चौपदरीकरणात विहिरी गेल्याने येथील पाण्याचा प्रश्न बिकट होणार आहे.
>कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्राला फटका
महामार्गाचे चौपदरीकरणात येथील मराठी शाळेचे क्रीडांगण गेले आहे. विविध क्रीडा स्पर्धांतील खेळाडू याठिकाणी सराव करायचे. मात्र आता सरावासाठी क्रीडांगणच नसल्याने खेळाडूंमध्ये नाराजी दिसून येत आहे. या ठिकाणी असलेल्या शाळेच्या व्यासपीठावर अनेक सांस्कृतिक कार्यक्र म केले जायचे, तेही आता होऊ शकणार नाही. मराठी शाळा एकदमच महामार्गावर आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.