उल्हासनदीवरील चार पुलांना मंजुरी, कर्जत तालुक्यातील वाहतूककोंडी सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 12:15 AM2019-12-01T00:15:37+5:302019-12-01T00:15:52+5:30
कर्जत तालुक्यातील उल्हासनदीवरील पूल जुना झाला आहे.
- विजय मांडे
कर्जत : तालुक्यातील उल्हासनदीवर पाच नवीन पूल बांधावेत, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. त्यातील चार पुलांना सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. या पुलांसाठी राज्य सरकारने तब्बल २० कोटींची तरतूद केली आहे. पुलांमुळे कर्जत तालुक्यातील दळणवळणाची सुविधा चांगली होणार आहे.
कर्जत तालुक्यातील उल्हासनदीवरील पूल जुना झाला आहे. अरुंद पुलामुळे होणारी वाहतूककोंडी कमी करण्यासाठी नवीन पूल बांधण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. या प्रकरणी माजी आमदार सुरेश लाड यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार यंदाच्या अर्थसंकल्पात कर्जत तालुक्यातील मागणी होत असलेल्या पाच पुलांपैकी चार पुलांचे बांधकाम करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. पुढील दोन वर्षांत पुलांची उभारणी पूर्ण करण्याचे आदेश शासनाने निविदेत दिले आहेत.
तालुक्यातील दहिवली-मालेगाव येथे असलेला कमी उंचीचा पूल पावसाळ्यात सतत पाण्याखाली जातो, त्यामुळे नव्याने पूल बांधताना उंची वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, शासनाने या पुलाला कामास मान्यता दिली नाही. यंदाच्या पावसाळ्यात दोन वेळा पूल पाण्याखाली गेला, इतकेच नव्हे तर तब्बल ३० तास पुराचे पाणी पुलावरून वाहत होते. त्यामुळे २५ वर्षांपूर्वीचा हा पूल धोकादायक बनला असून, कोसळण्याची शक्यता आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
उल्हासनदीवर आमराई येथील श्रीराम पूल येथे नवीन पूल मंजूर झाला आहे. पुलाच्या बांधकामामुळे कर्जत-मुरबाड रस्त्यावरील वाहतूक कमी होण्यास मदत होणार आहे. आता कर्जत-मुरबाड रस्त्याचे राष्टÑीय महामार्गात रूपांतर झाल्याने वर्दळ वाढण्याची शक्यता आहे.
शेलू-मोहिली यांना जोडणाऱ्या पुलाच्या बांधकामास मंजुरी दिली असून, या पुलाचे अंतर २०० मीटर असल्याने स्थापत्य अभियंते यांच्यासाठी हा पूल आव्हानात्मक असेल. शेलू येथील गणेशघाट येथे पुलाला सुरुवात होणार आहे. याच उल्हासनदीवर चांदई येथे पूल बांधण्यात येणार असून, सध्या असलेल्या अरुंद पुलाच्या बाजूला नवीन पूल उभारला जाणार आहे. चिंचवली-कडाव-तांबस- जांभिवली-वेणगाव-दहिवली-कोंडीवडे या राज्यमार्गावर हा पूल आहे.
उल्हासनदीवर शिरसे बंधाºयाखालील पुलाचे बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे. येथील पुलामुळे नेवाळी, मोहिली, आवळस या भागातील आणि पळसदरी स्थानकाकडे जाणाºया लोकांसाठी जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे.