माणगाव : मुंबई-गोवा हा महामार्गाचे चौपदरीकरण होत असून, त्याचाच दुसरा टप्पा इंदापूर ते कशेडी घाट याचे काम चालू झाले आहे. माणगाव तालुक्यातील इंदापूर ते वडपाले दरम्यान रस्त्याचे काम जलद गतीने सुरू झाल्याने चाकरमान्यांचा येथील परतीचा प्रवास त्रासदायक झाला. माणगाव परिसरात काही ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती.मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव शहरात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. ही वाहतूककोंडी चालकाची नेहमीच डोकेदुखी ठरत आहे. त्यातच गणेशोत्सवाकरिता कोकणात आलेले मुंबईकर परतीचा प्रवास करताना मंगळवार व बुधवार या दोन दिवशी चालकांना माणगाव शहरांतून, तसेच लोणेरे येथे वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागला. मात्र, ही कोंडी सोडविण्याकरिता व वाहतूक पोलीस यंत्रणांनी पर्यायी मार्गाचा चालकांना वापर करावयास सांगितल्याने वाहतूककोंडी कमी झाली. तसेच माणगाव, लोणेरे व इंदापूर शहरातून डिवायडर (दुभाजक)चा वापर केल्याने वाहतूककोंडी कमी होण्यास मदत झाली. मंगळवारी ही वाहतूककोंडी खूप मोठी होती, तर बुधवारला वाहतूककोंडी तुरळक प्रमाणात होती.म्हसळेत वाहतूक वळवलीम्हसळा : म्हसळेत बाजारपेठ परिसरात नेहमीच वाहतूककोंडी होते. मात्र, माणगावकडून येणारी वाहने थेट बायपास मार्गाने तर श्रीवर्धन-बोर्ली मार्गाने येणारी वाहने (अवजड वाहन वगळून) शहरातून वळवण्यात आल्याने वाहतूककोंडी सुटण्यास मदत झाली. त्यामुळे चाकरमान्यांचा परिसरातील प्रवास सोयीस्कर झाला.महामार्गावर वाहनांची गर्दीपोलादपूर : कोकणात गेलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले असून, मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर शहरातील रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी दिसून येत आहे. कशेडी महामार्ग पोलीस व पोलादपूर पोलीस यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवत महामार्गावर अधिक वाहतूककोंडी होऊ दिली नाही. मात्र, कशेडी घाटातील अपघाताची शृंखला चालू आहे. मंगळवारी झालेल्या अपघातामुळे सुमारे अर्धा तास वाहतूककोंडी झाली होती. जादा बसेस, तसेच खासगी वाहने परतीच्या प्रवासात मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतूक मंद गतीने चालू असल्याचे दिसून येते. पोलादपूर बसस्थानक व महामार्गावर प्रवासी मोठ्या संख्येने वाहनांची वाट पाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.वाहतूककोंडी टाळण्यासाठी पाचाड-निजामपूर पर्यायी मार्गमहाड : गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले चाकरमानी महामार्गावरील माणगावसह वडखळ आदी ठिकाणच्या वाहतूककोंडीपासून सुटका होण्यासाठी महाड पाचाड-निजामपूर या पर्यायी मार्गाचा वापर करीत आहेत.गतवर्षीच्या तुलनेत यंदा या वाहतूककोंडीवर उपाययोजना करण्यात वाहतूक पोलिसांना काही प्रमाणात यश आले असले तरीही नियमितच्या या वाहतूककोंडीवर पर्याय काढण्याची आवश्यकता आहे.कोकणात दरवर्षी लाखो चाकरमानी गणेशोत्सवासाठी जातात. यंदा महामार्गावरील खड्ड्यांचे साम्राज्य, तसेच यामुळे होणारी वाहतूककोंडी या बिकट समस्येवर मात करीत चाकरमानी कोकणात सुखरूप पोचले असले तरी चाकरमान्यांचा परतीचा प्रवास मात्र खडतर असल्याचे गेल्या दोन दिवसांपासूनच्या वाहतूककोंडीवरून स्पष्ट होत आहे.या वाहतूककोंडीला पर्याय म्हणून चाकरमानी महाड, पाचाड, घरोशीवाडी, निजामपूर, पास्को,पाली, खोपोली,एक्स्प्रेस वेमार्गे मुंबई या पर्यायी मार्गाचा वापर करीत आहेत. मात्र, अवजड वाहने आणि प्रवासी बसेसना या मार्गावर बंदी करावी, अशी मागणी केली जात आहे.
चौपदरीकरणामुळे वाहतूक मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 4:36 AM