चौपदरीकरणाचे काम २०१९ पर्यंत पूर्ण होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 04:49 AM2018-09-01T04:49:45+5:302018-09-01T04:50:26+5:30
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचा पाहणी दौरा : सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही
माणगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर पडलेले खड्डे गणेशोत्सवापूर्वी भरण्यात येणार आहेत. शिवाय या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २०१९ वर्षअखेर पूर्ण करणार असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
मुंबई-गोवा महामार्गाची रखडलेली कामे व खड्डेमय रस्त्याच्या पाहणीसाठी चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पनवेल ते माणगाव दौरा केला. माणगाव येथील विश्रामगृहात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय अवजडमंत्री अनंत गीते, रायगडचे पालक मंत्री रवींद्र चव्हाण, आ. प्रशांत ठाकूर, आ. भरत गोगावले, आ. अनिकेत तटकरे, आ. निरंजन डावखरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे आदी उपस्थित होते. त्याचबरोबर माणगाव उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव- दिघावकर, तहसीलदार ऊर्मिला पाटील, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोकणातील अतिवृष्टी, महामार्गावरून सुरू असलेली सततची अवजड वाहतूक आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे महामार्गाची दुर्दशा झाली आहे. महामार्गाचे पहिल्या टप्प्याचे काम निधीअभावी रखडले होते. मात्र आता केंद्राकडून १० हजार कोटींचा निधी उपलब्ध झाल्याने पनवेल ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा पत्रादेवीपर्यंतचे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करू, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. महामार्गाचे काम दोन टप्प्यात हाती घेण्यात आले असून पनवेल ते इंदापूरपर्यंत दोन टप्पे करण्यात आले आहेत. महामार्गाला सिमेंट काँक्र ीटच्या रस्त्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. या संपूर्ण रस्त्याचे काँक्रीटीकरण करणार असून १० ते १२ वर्षांत रस्त्यावर खड्डा पडणार नाही याची काळजी घेतली जाईल, तरीही खड्डे पडले तर त्यास ठेकेदाराला जबाबदार धरले जाईल. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी मुंबईतून कोकणात येतात. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी मुंबई- गोवा महामार्गावर सर्व खड्डे बुजवण्यात येतील, असे पाटील यांनी सांगितले.
वाकण पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा आदेश
नागोठणे : महामार्गाच्या पाहणी दौऱ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील पनवेल ते पोलादपूर दरम्यान वाकण नाका येथे काही काळ थांबले. जुन्या पुलाची दुरुस्ती करण्याचे गरजेचे असल्याने त्यांनी पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल आॅडिट करून दुरुस्ती करावी, असा आदेश संबंधित अधिकाºयांना दिला. पुलाच्या शेजारी नव्याने बांधकाम होत असलेल्या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, तसेच सध्या वापरात असलेला जुना पूल राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करावा असे निर्देशही दिले.
आंबेत पुलाची दुरु स्ती येत्या दोन महिन्यात पूर्ण करणार असून त्यासाठी १५ कोटींच्या खर्चाला पाटील यांनी मंजुरी दिली. हे काम राज्याच्या बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे पुलाचे आयुष्यमान ५ वर्षांनी वाढणार आहे.
आंबेत पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्यासाठी १५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सदर पुलाचा प्रस्ताव राज्याने लवकरात लवकर सादर केल्यावर केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून प्रस्तावाला मंजुरी घेण्याचे अभिवचन खासदार अनंत गीते यांनी दिले. नवीन पूल येत्या दोन वर्षात पूर्ण करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.