रायगडमध्ये चार विद्यमान आमदार हॅट्ट्रिकच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 02:45 AM2019-09-30T02:45:36+5:302019-09-30T02:45:57+5:30
भाजप-शिवसेना यांच्या जागावाटपाचे घोंगडे अजूनही भिजत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
- आविष्कार देसाई
अलिबाग - भाजप-शिवसेना यांच्या जागावाटपाचे घोंगडे अजूनही भिजत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोण कोठून लढणार याबाबत तर्क-वितर्क लढवले जात असले, तरी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड आणि शेकापचे आमदार धैर्यशील पाटील हे हॅट्ट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत, तर दुसरीकडे युती न होण्याच्या आधारावर उमेदवारांची अदलाबदल होऊन प्रमुख राजकीय पक्षातील उमेदवार अन्य पक्षाच्या तिकिटावर लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे.
युतीच्या जागावाटपाची घोषणा अद्याप झालेली नाही. भाजप-शिवसेनेला १२० पेक्षा कमी जागा देण्याची तयारीत असल्याने शिवसेना स्वाभिमान बाजूला ठेवण्याच्या मन:स्थितीमध्ये नसल्याचेच चित्र त्यानिमित्ताने दिसून येते. युती न झाल्याचा परिणाम राज्यात होत असताना रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभेच्या जागांवर त्याचा प्रभाव पडत आहे. युतीची घोषणा न झाल्याने काही ठिकाणच्या जागेवर कोण लढणार याबाबत कमालीची उत्सुकता लागून आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीत शेकाप आहे. मात्र, अलिबागमध्ये काँग्रेसचा उमेदवार उभा केला जाणार असल्याने अलिबाग वगळता अन्य ठिकाणी ही आघाडी असल्याचे चित्र दिसू शकते.
निवडणूक विभागाने आपल्या बाजूने सर्व तयारी पूर्ण केलेली आहे. मात्र, निवडणुकीच्या मांडवात ज्यांची लग्न लागणार आहेत, त्यांचीच नावे समोर आलेली नसल्याने जनतेच्या मनातील कुतूहल वाढले आहे.
२७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र, अद्याप प्रमुख पक्षातील उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे दिसत नाही. सोमवार, ३० तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.
युती-आघाडी यांचा सावळागोंधळ सुरू असताना दुसरीकडे पनवेलमधील भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर, महाडमधील शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, कर्जतमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड आणि पेणमधील शेकापचे धैर्यशील पाटील यांचे विधानसभेचे तिकीट पक्के समजले जात असल्याने ते सर्व हॅट्ट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत.
१आमदार प्रशांत ठाकूर, आमदार भरत गोगावले, सुरेश लाड आणि धैर्यशील पाटील हे २००९ आणि २०१४ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झालेले आहेत. त्यामुळे २०१९ मध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जिंकून ते हॅट्ट्रिक साधतील, अशी त्यांची आणि त्यांच्या समर्थकांची धारणा आहे. हॅट्ट्रिक साधण्यासाठी त्यांनी सर्व तयारी पूर्ण केलेली आहे. त्यामुळे युती अथवा आघाडीची वाट न बघता यांनी त्यांच्या पद्धतीने कामाला सुरुवात केल्याचे दिसून येते.
२प्रशांत ठाकूर हे भाजपच्याच तिकिटावर लढणार आहेत, तर धैर्यशील पाटील हे शेकापच्याच तिकिटावर लढणार असल्याचे त्यांच्याच पक्षाने जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड हे नक्की कोणत्या राजकीय पक्षाच्या तिकिटावर लढणार याबाबत मतदारसंघामध्ये अद्यापही उलटसुलट चर्चा आहे. मध्यंतरी त्यांनी याचा इन्कार करत राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
उमेदवारांची अदलाबदल
अद्यापही युतीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे युती झाली नाही तर उमेदवारांची अदलाबदल होऊ शकते, असे एका राजकीय पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. युती झाली नाही तर कोणत्या पक्षाचा उमेदवार कोठून लढणार याबाबत विचारले असता, दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल असे त्याने उत्तर दिले. दरम्यान, युती न होण्याच्या आधारावर उमेदवारांची अदलाबदल होण्याची शक्यता खरी ठरली, तर प्रमुख राजकीय पक्षातील उमेदवार अन्य पक्षातील तिकिटावर लढण्याची शक्यता त्यामुळे बळावली आहे.