फसवणूक करणाऱ्या चौघांना दिल्लीतून पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 06:44 AM2019-04-12T06:44:26+5:302019-04-12T06:44:31+5:30
अलिबागमधील तक्रारदार नागरिकास २०१५ मध्ये काही अज्ञात व्यक्तींनी मोबाइलवरून तसेच ई-मेलद्वारे ‘कमी कागदपत्रात जास्तीत जास्त कर्ज मिळवून देतो’ असे खोटे आमिष दाखविले होते.
अलिबाग : अलिबाग येथील एका नागरिकास २०१५ मध्ये मोबाइलवरून खोटी आश्वासने देऊन कर्ज देण्याचे आमिष दाखवून तब्बल ११ लाख ६० हजारांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी दिल्ली व उत्तर प्रदेश राज्यातील चौघांना मोठ्या शिताफीने दिल्लीतून अटक करण्यात रायगड पोलिसांना यश आले. राहुल वर्मा (३५, रा. लखनौ, उत्तर प्रदेश), सोनू सुरेंद्र (३०, रा. नवीन रजितनगर, दिल्ली), राहुल दयानंद चंडालिया (३१, रा. नवीन रजितनगर, दिल्ली) आणि राहुल कुमार उर्फ अशोक कुमार उर्फ मनोजकुमार श्रीरामतिरथ वर्मा (२४, रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
अलिबागमधील तक्रारदार नागरिकास २०१५ मध्ये काही अज्ञात व्यक्तींनी मोबाइलवरून तसेच ई-मेलद्वारे ‘कमी कागदपत्रात जास्तीत जास्त कर्ज मिळवून देतो’ असे खोटे आमिष दाखवून मिळणाºया कर्जाची प्रोसेसिंग फी व इतर वेगवेगळी करणे सांगून सुमारे पाच ते सहा महिन्यांत तक्रारदारांकडून विविध बँक खात्यात एकूण ११ लाख ६० हजार ४८० रुपये रक्कम या भामट्यांनी भरणा करून घेतली; परंतु दिलेल्या तक्रारदारांना कोणत्याही प्रकारचे कर्ज उपलब्ध करून न देता त्यांची फसवणूक केली. या फसवणूक प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात १३ जानेवारी २०१६ रोजी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
साडेसहा लाख आढळले
पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, हा गुन्हा त्यांनीच केल्याची कबुली दिली. गुन्ह्यातील अपहार केलेल्या ११ लाख ६० हजार ४८० रुपये रकमेपैकी एकूण सहा लाख ४५ हजार ४८० रु पये रोख रक्कम परत मिळविण्यात यश आले आहे.