आविष्कार देसाई -
रायगड - ओमान आणि दक्षिण अफ्रिकेतून आलेले दोन्ही नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता दुबई, मंगलोर असा प्रवास करुन रोहा तालुक्यात आलेल्या तीन, तर ब्रिटनमधून आलेल्या एक, अशा चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे, या चौघांनीही कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत. आतापर्यंत परदेशातून आलेल्या कोरोना झालेल्या नागरिकांची संख्या सहा झाली आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होत असल्याने रायगड जिल्ह्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.
रोहा तालुक्यात आलेले तिन्ही नागरिक एकाच कुटुंबातील आहेत. पुरुषाचे वय ५५ वर्ष, तर दोन महिलांचे वय अनुक्रमे ४९ आणि २१ असे आहे. हे कुटुंब दुबई येथून मंगलोर येथे ११ डिसेंबर रोजी पोहोचले होते. त्यानंतर १८ डिसेंबरपर्यंत ते उडपी येथे वास्तव्यास होते. १९ डिसेंबर रोजी तिन्ही व्यक्ती रोहा येथे आल्या. त्यांची आरटीपीसीआर टेस्ट केल्यावर त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. सध्या त्यांना स्थानिक रुग्णालयात निगरानीखाली ठेवण्यात आले आहे. तिन्ही नागरिकांनी १६ जानेवारी आणि ६ फेब्रुवारी दरम्यान भारताबाहेर सिनोफार्म लसीचे डोस घेतले आहेत. तसेच २ ऑगस्ट २०२१ आणि २३ ऑगस्ट २०२१ रोजी फायझर लसींचेही दोन्ही डोस घेतले आहेत.
तसेच पनवेल महानगर पालिका हद्दीत एक १८ वर्षीय तरुण १८ डिसेंबर रोजी ब्रिटनमधून आला आहे. त्याला तापाची लक्षणे असल्याने त्याने आरटीपीसीआर टेस्ट केली असता. ती पॉझिटिव्ह आली आहे. या तरुणाने कोव्हिशील्डचा पहिला डोस १७ जून रोजी आणि दुसरा डोस १७ ऑगस्ट रोजी घेतला आहे. रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, चारही रुग्णांचे नमुने पुणे येथील विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यावरच त्यांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे का? हे स्पष्ट होणार आहे, अशी माहिती जिल्हा सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गुंजकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. ओमान आणि दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोन्ही नागरिकांचे अहवाल पुणे प्रयोगशाळेतून प्राप्त झालेले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.