दोन अपघातांत चार जखमी
By admin | Published: March 12, 2017 02:22 AM2017-03-12T02:22:58+5:302017-03-12T02:22:58+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर महाड तालुक्यातील शहर पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास झायलो जीप व इंडिका कारमध्ये समोरासमोर भीषण टक्कर झाली
दासगांव : मुंबई-गोवा महामार्गावर महाड तालुक्यातील शहर पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास झायलो जीप व इंडिका कारमध्ये समोरासमोर भीषण टक्कर झाली. या अपघातामध्ये दोन महिला व एक पुरुष, असे तीन प्रवासी जखमी झाले, तर त्या वेळी सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास याच महामार्गावार काही अंतरावर कबुली गावचे हद्दीत एक पेट्रोल-डिझेलचा खाली टँकर झाडावर आपटल्याने त्यातील एक प्रवासी, असे दोन्ही अपघात मिळूण ४ प्रवासी जखमी झाले.
दासगावच्या अपघातात इंडिका कारच्या धडकेने झायलो जीप ही महामार्गावरच रस्त्यामधोमध पलटी झाली. त्यामुळे माहामार्गावर जाणारी वाहतूक एक तास ठप्प झाली. तीन दिवसांच्या सुट्यांमुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अपघाताचा मोठा फटका सहन करावा लागला. अपघातानंतर ६ कि.मी.पर्यंत दोन्ही दिशेने वाहनांच्या रांगाच लागल्या होत्या. मात्र, महाड वाहतूक शाखेमध्ये कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अपघातामध्ये ही वाहतूक शाखा अपेक्षेप्रमाणे साहाय्यता करू न शकल्याने याचा फटका शनिवारी वाहतुकीला बसला.
शनिवारी पहाटे योगेश जगन्नाथ खानविलकर (वय ३१, रा. मालाड, मुंबई) हा आपल्या ताब्यातील झायलो जीप घेवून मुंबई ते गोवा असा जात असताना समोरून आलेल्या इंडिका कारने धडक दिल्याने झायालोमधील शुभांगी शांताराम हेडगीलकर (७५, रा. सवेनी, ता. खेड) आणि ज्योती जगन्नाथ खानविलकर (वय ५५, रा. मालाड, मुंबई) या दोघी जखमी झाल्या असून या अपघाताबाबत इंडिका कारचालक आकाश अशोक निवाते (रा. दासगांव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)