चार प्रमुख नद्या पातळी बाहेर, पाली, जांभूळपाडा पूल पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 02:31 AM2019-09-05T02:31:28+5:302019-09-05T02:31:35+5:30
ताम्हाणी, भिसे खिंडीत दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प , वीज गायब
चोवीस तासातील पाऊस : बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात एकूण २,८४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. खालापूर (२६८) माणगाव (२६०), रोहा (२५७), माथेरान (२५४), उरण (२३०), मुरु ड (१८५), म्हसळा (१८०), तळा (१७६), कर्जत (१५८),
सुधागड (१४२), श्रीवर्धन (१४०), पनवेल (१४०), पेण (१३५), अलिबाग (११७), पोलादपूर (११४), महाड (९१). आकडेवारी मिमीमध्ये.
अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सावित्री, आंबा, पाताळगंगा आणि कुंडलीका या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने नदी काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला होता. ताम्हाणी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्याचप्रमाणे भिसे खिंडीमध्येही दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावरही वाहतूककोंडीचा सामाना करावा लागला. जिल्ह्यातील उदभवलेल्या आपतकालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी पुण्याहून दोन एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. पुढील ४८ तासा सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. जुलै आणि आॅगस्ट महिन्यात बरसलेल्या पावसाने जिल्ह्यात महापुराची स्थिती निर्माण झाली होती. आताही पावसाने तसात धडाका लावल्याने रायगडकरांच्या उरात पुन्हा धडकी भरली आहे. सतत पडणाºया पावसामुळे ताम्हाणी घाट आणि रोहा- नागोठणे येथील भिसे खिंडीमध्ये दरड कोसळल्याने वाहतुकीवर विपरित परिणाम झाला. ताम्हाणी घाटात कोसळललेल्या दरडीची गंभीरता अधिक आहे. त्याचप्रमाणे पेण, अलिबाग, पनवेल, रोहा- नागोठणे, महाड, माणगाव येथील पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती.
आंबा, सावित्री, पाताळगंगा आणि कुंडलीका या नद्यांनी सकाळीच धोक्याची पातळी ओलांडल्याने नदी काठच्या गावांमध्ये पाणी शिरले होते. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अंबा, सावित्री नद्यांनी बुधवारी सकाळी धोका पातळी ओलांडल्याने नागोठणे आणि महाड परिसरातील सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली. पाताळगंगा नदीने धोकापातळी ओलांडल्याने सावरोली येथील पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे खालापूरकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अंबा नदीच्या पाणी पातळीतही वेगाने वाढ झाल्याने वाकण -पाली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्याचबरोबर जांभूळपाडा पूल पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक काही कालावधीसाठी थांबविण्यात आल्याने वाहन अडकून पडली होती. मोर्बा पुलावरुनही पुराचे पाणी वाहत असल्याने माणगाव-श्रीवर्धन वाहतुकीलाही ब्रेक लागला होता.
सावित्री, गांधारी नद्यांनी ओलांडली
धोक्याची पातळी
संततधार पावसामुळे सावित्री,गांधारी आणि काळ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने या नद्यांचे पाणी महाड शहरात शिरले. ऐन गणेशोत्सवात संततधार पावसामुळे तसेच पुरामुळे भक्तांचा हिरमोड झाल्याचे पहायला मिळाले. बुधवारी सकाळी शहराच्या सखल भागात पुराचे पाणी शिरायला सुरवात झाली. दस्तूरी मार्ग,अर्जुन भोईमार्ग, भोईघाट, बंदरनाका ,गांधारी पुलावर पुराचे पाणी होते. यामुळे दस्तूरी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. ६ आॅगस्टला आलेल्या महापुराच्या नुकसानीच्या तडाख्यातुन अद्यापही बाहेर न पडलेल्या महाडकरांमध्ये या पुराची मोठी दहशत निर्माण झाली आहे.
समुद्राच्या उधाणामुळे पातळी वाढली
पावसाचा जोर दिवसभर सुरुच असतानाच समुद्राला दुपारी उधाण आल्याने सकाळच्या तुलनेत पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी वाढल्याने ते थेट नागरिकांच्या घरात घुसले. त्यामुळे गणपती बाप्पालाही भक्तांच्या घरी पाण्यात राहावे लागले. जिल्ह्यातील अशा आपती कालावधीत मदत आणि बचाव कार्यासाठी पुण्याहून एनडीआरएफच्या दोन पथकांना पाचारण करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी यांनी सांगितले. तलाठी, कोतवाल, मंडळ अधिकारी यांना गावात जाऊन आढाव घेण्यास सांगितले आहे. तसेच तहसिलदार प्रांताधिकारी, पोलीस यंत्रणा या सर्वांना मदत आणि बचाव कार्यासाठी सर्तक राहण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात असणाºया खासगी आणि सरकारी बोटींना तत्पर ठेवण्याचेही आदेश संबंधीत यंत्रणेला दिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, दुपारनंतर माणगाव ताम्हाणी घाटमार्गे पुण्यातील वाहतूक काही प्रमाणात सुरु करण्यात आली. त्यामुळे अडकून पडलेल्या वाहन चालकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
महाड -भोर मार्गावरील एसटी वाहूतक बंद
काळ नदीच्या पातळीत वाढ झाल्याने नदीचे पाणी बिरवाडीतही घुसले. किनारा हाँटेल मार्ग या पुरामुळे बंद होता. अतिवृष्टीमुळे महाड -भोर मार्गावर वाघजाई घाटात पुन्हा दरडी कोसळल्या आहेत. मागील महिन्यात हा घाट खचल्याने हा मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या मार्गाने पुण्याकडे जाणाºया प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. महाड -भोर मार्गावरील एसटीची वाहतूक देखील पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. वारंवार कोसळणाºया दरडी तसेच खचलेल्या घाटमार्गामुळे येथील वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी दोन महिने तरी प्रतिक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
दासगाव /महाड : महाड आणि परिसराला मंगळवारपासून पावसाने अक्षरश: झोडपून काढले. सध्या निर्माण झालेली मंदी आणि त्यामध्ये पडणारा पाऊस यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गणपती सणाला सुरवात झाली मात्र पावसामुळे दरवर्षी गावी येणारे चाकरमानी यावेळी आले नसल्याने सण असूनही शांततेचे वातावरण आहे. काही दिवसापूर्वीच महाडमध्ये मोठ्या प्रमाणात पुराने थैमान घातले होते. व्यापऱ्यांचे तसेच घरांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. शासनाकडून या पूरग्रस्तांना आजपर्यंत एकही रुपया आर्थिक मदत मिळालेली नाही. त्यातच गणपती सणाला सुरवात झाली. व्यापारी सणामध्ये सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच पुन्हा मंगळवारी महाडमध्ये जोरदार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली. महाड शहरात येणारे गांधारी आणि रायगड मार्ग बंद पडले. तर तालुक्यातील दासगाव खाडीपट्ट्यात नदीने धोक्याची पातळी ओलांडून मोठ्या प्रमाणात शेतात पाणी शिरल्याने पुन्हा शेतकºयांना चिंतेत टाकले. काही दिवसापूर्वी आलेल्या पुरामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते मात्र पुन्हा आलेल्या पुरामुळे शिल्लक राहिलेल्या शेतीचे देखील नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.