कळंबोली जेएनपीटी मार्गावर चार नव्या मार्गिका, कामाला सुरूवात
By वैभव गायकर | Published: June 24, 2024 04:25 PM2024-06-24T16:25:59+5:302024-06-24T16:26:22+5:30
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातुन केले जाणारे हे काम एमएसआरडीसीच्या देखरेखीत केले जाणार आहे.
पनवेल: नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याच दृष्टीने विमानतळाला जोडणारी दळणवळण व्यवस्था आणखी सुखकर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि एमएसआरडीसी यांच्या माध्यमातुन कर्नाळा स्पोर्ट्स परिसरात खांदा गावाजवळ चार नव्या मार्गिका विकसित करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या नव्या मार्गिकांमुळे विमानतळ गाठणे विना वाहतुक कोंडी शक्य होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातुन केले जाणारे हे काम एमएसआरडीसीच्या देखरेखीत केले जाणार आहे. कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी परिसरात नवी मुंबई विमानतळाचे प्रवेशद्वार असणार आहे. याठिकाणी या चार मार्गिका तसे इतरही कामे केली जाणार असुन याकरिता सुमारे 512 कोटींचा खर्च येणार आहे. एका वर्षात हे काम पूर्ण होणार असुन 1 मार्च 2025 हि या कामाची डेडलाईन असणार आहे. नव्याने उभारल्या जाणार मार्गिकेमध्ये नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ ते कळंबोली, जेएनपिटी ते विमानतळ, कळंबोली ते कर्नाळा स्पोर्ट्स आणि कर्नाळा स्पोर्ट्स वरून थेट विमानतळ अशा मार्गिका असणार आहेत. कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी परिसरात पनवेल महानगर पालिकेचे स्वराज्य नामक मुख्यालय देखील उभे राहत आहे. भविष्यात लोकप्रतिनिधी सर्वसामान्य नागरिकांची वर्दळ या मुख्यालयात वाढणार असल्याने या नव्या मार्गिकेचा फायदा या पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात येण्यासाठी देखील होणार आहे.
सायन पनवेल महामार्गावरील ताण होणार कमी
पनवेल शहरातून जाण्यासाठी सायन पनवेल महामार्गावरून येजा करावी लागते.या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. या नव्या मार्गिकांमुळे सायन पनवेल महामार्गावरील वाहतुकीचे ताण कमी होणार असुन भविष्यात कार्यान्वित होणारे नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ गाठणे सहज शक्य होणार आहे.
या कामांमुळे नवी मुंबई अंतराष्ट्रीय विमानतळ गाठणे सहज शक्य होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे केले जाणारे हे काम एमएसआरडीसीच्या देखरेखीत केले जात आहे. याकरिता भूसंपादनासह सर्व प्रकारची प्रक्रिया राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर्ण केली आहे. 1 मार्च 2025 पर्यंत हे काम पूर्णत्वास येईल, असं अभियंता, एमएसआरडीसी राहुल जाधववार म्हणाले.