गस्तीसाठी तैनात नऊपैकी चार स्पीडबोटी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 11:31 PM2020-02-07T23:31:33+5:302020-02-07T23:32:08+5:30
रायगड पोलीस दलाच्या ताफ्यात गस्तीसाठी तैनात असणाऱ्या नऊपैकी चार स्पीडबोटी बंद पडलेल्या आहेत.
- निखील म्हात्रे
अलिबाग : रायगड पोलीस दलाच्या ताफ्यात गस्तीसाठी तैनात असणाऱ्या नऊपैकी चार स्पीडबोटी बंद पडलेल्या आहेत. जिल्ह्यामध्ये स्पीडबोट दुरुस्तीची नसलेली सोय, कुशल कर्मचाऱ्यांची कमतरता, अतिसंवेदनशील बंदरांवर नसलेली सुरक्षाव्यवस्था यामुळे जिल्ह्यात सागरीसुरक्षेचे तीन-तेरा वाजल्याचे दिसून येते. सागरीसुरक्षेकडे सरकार गंभीरतेने पाहत नसल्यानेच समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवताना रायगडपोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील बोटींची दुरु स्ती करण्यासाठी रत्नागिरीमध्ये कार्यशाळा उभारण्याचा प्रस्ताव मागील काही वर्षांपासून सरकार दरबारी पडून आहे. त्याला गती देण्याची गरज आहे.
समुद्रमार्गे अतिरेकी कारवाई होण्याची भीती सतत वर्तविण्यात येते. रायगड जिल्ह्याला २४० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. १८ पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील पोलीसदल समुद्रातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवते. समुद्रात गस्त घालण्यासाठी नऊ स्पीडबोटी पोलीस दलाला देण्यात आल्या आहेत. मात्र, सद्यस्थितीत त्यामधील चार स्पीडबोटी या बंद पडल्या आहेत. त्याचप्रमाणे कुशल कर्मचाºयांची कमतरताही पोलिसांना भेडसावत आहे. खलाशी, सारंग, इंजिन ड्रायव्हर यांची कमतरता पोलिसांना सातत्याने भेडसावत आहे. त्यामुळे सुस्थितीत असलेल्या बोटींपैकी काही बोटी नेहमी बंदरांवरच नांगर टाकून उभ्या असल्याचे दिसून येते, तसेच या बोटी उभ्या करण्यासाठी पोलिसांकडे स्वत:चे बंदर नसल्याने बोटी नांगरून ठेवण्यातही अडचण निर्माण होत आहेत.
सागरी गस्तीसाठी जिल्ह्याला मिळालेल्या स्पीडबोटींच्या दुरु स्तीचा प्रश्न मात्र सुटलेला नाही. या बोटींमध्ये काही बिघाड झाल्यास बोटींच्या
दुरु स्तीचे काम मुंबई किंवा ठाणे शिपयार्ड या कंपन्यांतील ठेकेदारांना द्यावे लागते. त्यामुळे बोटींची दुरु स्ती करून ती पुन्हा पोलीस दलाकडे येण्यासाठी किमान महिनाभरापेक्षा जास्त कालावधी लागतो. या कालावधीत गस्तीवर फार मोठा विपरित परिणाम होते.
नौदलाने केलेल्या सर्वेक्षणात रायगडमधील २० बंदरे अतिसंवेदनशील
नौदलाने केलेल्या सर्वेक्षणात रायगड जिल्ह्यातील २० बंदरे अतिसंवेदनशील आढळली होती. या बंदरांवर सुरक्षारक्षकांसह पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आहे. मत्स्य विकास विभागाने या कर्मचाºयांची नेमणूक करणे गरजेचे होते. मात्र, अद्यापपर्यंत ही नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे अतिसंवेदनशील बंदरांवरील सुरक्षेचे तीन-तेरा वाजले आहेत.
जिल्ह्यात मांडवा, रेवस, जुनी आरसीएफ जेट्टी, थळ-नवगाव, अलिबाग मेन बिच, रेवदंडा पूल-१, रेवदंडा पूल-२, साळाव, नांदगाव, मुरुड खोरा, आगरदांडा-१, राजपुरी, दिघी पोर्ट जेट्टी, दिघी पॅसेंजर जेट्टी, शेखाडी, जीवनाबंदर, बागमांडला, मांदाड-१, दादर, आंबेत अशी विविध बंदरे अतिसंवेदनशील आहेत.
पोलिसांच्या ताफ्यात असणाºया चार स्पीडबोट नादुरुस्त असल्या तरी सागरी सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन ताब्यात असलेल्या चालू ५ स्टीडबोट तसेच खासगी टॉलर बोटीमार्फत आमचे जवान गस्त घालत आहेत. त्यामुळे सागरीसुरक्षेच्या बाबतीत तडजोड करण्यात आलेली नाही.
-अनिल पारस्कर, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक
पोलीस दलावर सुरक्षेची जबाबदारी दिलेली असली, तरी त्यांच्या ताफ्यात गस्तीसाठी असलेल्या स्पीडबोटी बंद पडल्या आहेत. दुरुस्तीची जिल्ह्यात सोय नसल्याने अडचण होत आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक मुख्यालयाच्या ठिकाणी दुरुस्तीची व्यवस्था असावी.
-अॅड. राकेश पाटील, स्थानिक
सुरक्षेसाठी स्थानिकांची घेतली जातेय मदत
सागरी सुरक्षेवर लक्ष ठेण्यासाठी पोलीस दलातर्फे स्थानिकांची मदत घेतली जात आहे. विविध स्तरावर सागरी सुरक्षा समित्या स्थापन केल्या आहेत. यामध्ये मच्छीमार संस्थांचे सदस्य आणि पदाधिकाºयांसह स्थानिकांचा समावेश आहे. समुद्रात एखादी संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलीस दलासोबत संपर्क साधण्याचे आवाहन सातत्याने रायगड पोलिसांकडून करण्यात
येत आहे.