मुंबईच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; एक मित्र बुडू लागला म्हणून इतर तिघे गेले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 07:13 AM2024-06-22T07:13:08+5:302024-06-22T07:13:50+5:30

खालापूर तालुक्यातील मोरबे धरणाच्या बंधाऱ्यात दुर्घटना.

Four students drowned in Mumbai | मुंबईच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; एक मित्र बुडू लागला म्हणून इतर तिघे गेले अन्...

मुंबईच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; एक मित्र बुडू लागला म्हणून इतर तिघे गेले अन्...

लोकमत न्यूज नेटवर्क, मोहोपाडा : मुंबईतून पर्यटनासाठी आलेल्या ३७ तरुणांच्या गटातील चौघांचा खालापूर तालुक्यातील  पोखरवाडी जवळच्या मोरबे डॅम साईबंधारा येथे बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. इशांत यादव (वय १९), आकाश धर्मदास माने (वय २६), रणथ महादू बंदा (वय १८) आणि एकलव्य सिंग (वय १८) अशी मृतांची नावे आहेत. यापैकी काही जण रिझवी काॅलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचे समजते.  


मुंबईतील विविध काॅलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुणांचा एक गट सकाळी सोडाई किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आला होता. मात्र, ट्रेकिंगला जाण्याऐवजी ते दुपारी पोखरवाडी येथील मोरबे डॅमच्या बंधाऱ्याजवळ आले. यापैकी एक जण बंधाऱ्यात पोहण्यासाठी उतरला. त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो बुडत असताना वाचविण्यासाठी अन्य तिघे मित्र गेले. यामध्ये चौघांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, खालापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे आदी घटनास्थळी दाखल झाले. 


अपघातग्रस्त मदत टीमचे गुरुनाथ साठेलकर यांच्यासह पथकाने स्थानिकांच्या मदतीने चारही तरुणांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले. त्यांचे चौक ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत उपविभागीय अधिकारी विक्रम कदम पुढील तपास करीत आहेत.
 

Read in English

Web Title: Four students drowned in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.