चार हजार पेंढ्या खाक
By admin | Published: January 25, 2017 04:57 AM2017-01-25T04:57:53+5:302017-01-25T04:57:53+5:30
तालुक्यातील वदप गावातील प्रगत शेतकरी विनय वेखंडे यांनी साठवून करून ठेवलेला गुरांचा चारा अचानक लागलेल्या आगीत जळून खाक
कर्जत : तालुक्यातील वदप गावातील प्रगत शेतकरी विनय वेखंडे यांनी साठवून करून ठेवलेला गुरांचा चारा अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाला. साधारण ४००० पेंढ्यांच्या मोळ्या जळून खाक झाल्याने वेखंडे यांचे मोठे नुकसान झाले आहे. कर्जत नगरपालिकेचे अग्निशमन करणारी गाडी घटनास्थळी पोहोचल्याने आजूबाजूच्या घरांचे नुकसान टळले.
राजनाला कालवा परिसरात मोठ्या प्रमाणात भाताची शेती केली जाते. वदप येथील विनय वेखंडे यांच्याकडे शेतीची कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुरे असून त्यांना चारा लागत असल्याने वेखंडे यांच्यासारखे मोठे शेतकरी चारा साठवून ठेवतात. प्रामुख्याने भाताच्या आणि गवताच्या मोळ्या स्वरूपातील चाऱ्याची साठवण करुन ठेवली जाते. वेखंडे यांनी घराच्या बाजूला आसपासच्या शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या ४००० चाऱ्याच्या पेंढ्या साठवून ठेवल्या होत्या. विनय वेखंडे २४ जानेवारी रोजी सकाळी शेतीची कामे करण्यात व्यस्त होते. सकाळी साडे नऊच्या सुमारास चारा ठेवलेल्या मोळींना आग लागली. आग वाढत जात असल्याचे पाहून वेखंडे यांनी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांना फोन करून माहिती दिली.
२० मिनिटात कर्जत नगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा वदप गावात पोहचली. तोपर्यंत त्यांच्या घरासमोरील ४००० पेंढ्या जळून खाक झाल्या होत्या. बंबाच्या साहाय्याने आग वाढणार नाही याची तात्काळ काळजी घेतल्याने आजूबाजूच्या घरांना निर्माण झालेला धोका टळला. या अचानक लागलेल्या आगीमुळे वेखंडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. साधारण चार ते पाच
रुपये दराने एका पेंढीची विक्री होत असते. साठवूण ठेवलेल्या सर्व ४००० पेंढ्या खाक झाल्याने आता पुन्हा आर्थिक झळ सोसून वेखंडे यांना चारा खरेदी करावा लागणार आहेत. मात्र पुन्हा एवढा चारा मिळणे कठीण असल्याने वेखंडे यांच्याकडील गुरांच्या चाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे.