पळसगडावर सापडला चौथा दरवाजा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 01:16 AM2019-04-23T01:16:44+5:302019-04-23T01:17:00+5:30
माहुली किल्ला या दुर्गत्रिकुटामधील गड; सह्याद्री प्रतिष्ठानची शोध मोहीम
- संजय गायकवाड
कर्जत : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील माहुली किल्ला या दुर्गत्रिकुटामधील पळसगडावरगडाचा चौथा दरवाजा सापडला आहे.
सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर दुर्ग संवर्धनाचे काम करत आहे. प्रतिष्ठानच्या शहापूर विभाग गेल्या चार वर्षांपासून माहुली किल्ल्यावर दुर्गसंवर्धन करत आहे. गडावरील महादरवाजा पायऱ्या स्वच्छता, भांडरदुर्ग येथे संवर्धनाची कामे सुरू असतात. तसेच गडावर स्थळदर्शक, दिशादर्शक सूचना फलकही संस्थेमार्फत लावण्यात आलेत. एकाच डोंगरावर घळीमुळे जे तीन डोंगर वेगळे झाले त्यावर माहुली किल्ला, भंडारदुर्ग आणि पळसगड असे दुर्ग त्रिकुट आहेत. २० एप्रिल रोजी सह्याद्री प्रतिष्ठान शहापूर विभाग सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ गुरुनाथ आगीवले यांच्या सोबत गडावरील दुर्ग अवशेष शोध मोहीम सुरू झाली. तिन्ही किल्ल्याचा इतिहास त्यांचे स्थापत्य या दृष्टीने गणेश रघुवीर आणि त्यांची टीम गडावरील जंगलात अवशेष शोधण्यासाठी निघाले यामध्ये त्यांना गडाच्या २ ते ३ घळी उतरून चढावे लागले तर काटेरी झाडी झुडपातून जावे लागले. शहापूर विभागाचे संपर्क प्रमुख गौरव राजे आणि गुरुनाथ आगीवले यांनी गेल्या आठवड्यात पळसगड पाहणीत खाली दरवाजाचे अवशेष आहेत असे सांगितले होते. गडावरील इतर झाडीत असलेले दुर्ग अवशेष शोधण्यासाठी आणि दरवाजाचे अवशेष पाहण्यासाठी मंगळवारी शोध मोहीम सुरू झाली. चार दुर्गसेवकांच्या टीमने पळसगडावरील खोर मार्गे येणाºया घळीतून वर चढाई केली तेव्हा घळीच्या दोन्ही बाजूच्या कातळात तटबंदी आणि अर्धवर्तुळाकार दगडी तुटलेली कमान होती. या कमानीच्या वर डाव्या बाजूला ३० फूट उंच नृत्य प्रकारात गणपती मूर्ती शिल्प कोरलेले आहे. तर कमानीच्या वरच्या बाजूला पळसगडाच्या दिशेला मातीने बुजलेल्या आठ पायºया आहेत. त्याच्यावर जात्याचा अर्धा भाग आहे. त्यापुढे वाट ही पळसगडाकडे जाते.
आजपर्यंत किल्ल्यावर झालेल्या लिखाणात गडावर महादरवाजा, कल्याण दरवाजा आणि हनुमान दरवाजा या तीन दरवाजांच्या नोंदी आहेत. पर्यटक आणि गिर्यारोहक या तिन्ही दरवाजाजवळ पाहणीसाठी जात असतात, परंतु हा दरवाजा कित्येक वर्षे दुर्लक्षित असून यांच्या नोंदी आढळत नाहीत. गडाचा चौथा दरवाजा गणेश दरवाजा किंवा गणपती दरवाजा म्हणून असावा कारण या दरवाजावर गणेशाचे मूर्ती शिल्प आहे. खोर गावातून येणाºया वाटेवर महादरवाजाप्रमाणेच या दरवाजावर लहान दगडी तुटलेली कमान आहे. अर्धी कमान ही मातीत आणि दगडात गाडली गेली होती. संस्थेच्या सदस्यांनी कमानीखालचे दगड काढले. सध्या कमानीची अर्थात दरवाजाची उंची ही ४.५ फूट एवढी आहे. आणखी खाली गाळ माती काढली तर ५ फूट खोल एवढा दरवाजाचा खालचा भाग मोकळा होईल, असे संस्थेचे दुर्ग संवर्धन अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी सांगितले. या शोध मोहिमेत गौरव राजे, गुरु नाथ आगीवले, सुयोग जगे आणि गणेश रघुवीर यांनी सहभाग घेतला होता.
गडाच्या इतिहासात डोकावत आपल्याला इ.स.१६८४ निजामशाही कालखंडापासून झाकलेले बांधकाम त्यानंतर मोघल सरदार मनोहरदास गौड यांनी तिन्ही गडाची केलेली बांधणी आणि मोठ्या प्रमाणात केलेली डागडुजी तसेच मराठ्यांच्या काळात गडावर बांधकाम झाले. पळसगडावरील नव्याने सापडलेल्या दरवाजाच्या वर गणपतीचे शिल्प आहे. आज आम्ही गडाच्या इतिहासापासून लुप्त झालेला दरवाजा नव्याने प्रकाशात आणतोय याचा आम्हाला आनंद आहे.
- गणेश रघुवीर, दुर्ग अभ्यासक, अध्यक्ष दुर्ग संवर्धन विभाग सह्याद्री प्रतिष्ठान
मी गडावर संस्थेच्या दुर्गसंवर्धन मोहिमेसाठी येत असतो, पण इथे दरवाजा असेल असे वाटले नव्हते. खालून वर चढाई अवघड असून शहापूर विभागाच्या शोध मोहिमेत दरवाजा प्रकाशात आला याचा मला आनंद आहे.
- गौरव राजे,
संपर्क प्रमुख, शहापूर
सह्याद्री प्रतिष्ठान शहापूर विभाग ही गेली काही वर्षे महादरवाजाकडील मातीत गाडलेल्या पायºया मोकळ्या करत आहेत. सलग मोहिमा माहुलीवर सुरू असून आता या दरवाजाच्या पायºयावरील माती मोकळी करून दरवाजाला नवीन संजीवनी देणार.
- अनिरु द्ध थोरात,
अध्यक्ष, शहापूर विभाग
मी गेल्या २५ वर्षांपासून माहुलीगडावर येत आहे. मला गडाचा खडा न खडा माहीत आहे, आजवर जवळपास ५० हून अधिक लोकांनी रेस्क्यू केले आहे. गिर्यारोहक आणि सुळके सर करणारे यांच्या सोबत नेहमी जात असतो, पण हा दरवाजा मी यापूर्वी पाहिलेला नाही किंवा माझ्या पूर्वजांनी सुद्धा असा दरवाजा गडावर आहे याची माहिती दिली नाही.
- गुरु नाथ आगीवले,
माहुलीगाव ग्रामस्थ