पनवेल : लॉकडाऊनमुळे अनेकांना विवाह पुढे ढकलावे लागले, तर अद्यापही काही जण जमलेले विवाह सुरळीत पार पाडण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत पनवेल तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायतीने पंचायतीच्या वतीने चार लग्न लावून सामाजिक सलोखा जपला आहे.शिवकर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच अनिल ढवळे यांच्या पुढाकाराने प्रियांका रोडे व आकाश रुके यांचा विवाह रविवार, २० डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पडला. वधू प्रियांका या शिवकर ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवासी आहेत. यापूर्वी तीन विवाह सोहळे पार पडले. यामध्ये एका आंतरजातीय विवाहचा समावेश आहे. विवाह सोहळ्याचा सर्व खर्च ग्रामपंचायतच उचलत आहे. विवाह सोहळ्याची तत्काळ नोंदणी करून वधूवरांना तत्काळ विवाह नोंदणी प्रमाणपत्र सुपुर्द करण्यात येत असल्याची माहिती सरपंच ढवळे यांनी दिली. यापूर्वी आंतरजातीय विवाह सोहळ्यासाठी शासनाकडून मिळणारी मदत नवदाम्पत्याला शिवकर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळवून देण्यात आली आहे.
२५ हजारांची मदतसामाजिक सलोखा कायम राहावा, समाजामधील सर्वच घटकांना एकत्र आणण्यासाठी सामूहिक विवाह सोहळा ही संकल्पना राबविण्यात आली आहे. या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी झाल्यास नवदाम्पत्याला ग्रामपंचायत २५ हजारांची आर्थिक मदत करणार असल्याची माहिती सरपंच ढवळे यांनी दिली.