विनोद भोईर पाली : सात-बारा डिजिटल स्वाक्षरी करण्यासाठी सुधागड तालुक्याला महाराष्ट्रात चौथा, तर जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळाला आहे. तालुक्यातील ४४ हजार ९५३ सात-बारा डिजिटल साइन करण्याचे काम पूर्ण केले आहे.
रायगड जिल्ह्यात सुधागड, पनवेल, तळा, उरण, श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड, खालापूर, पोलादपूर, रोहा, महाड, माणगाव, पेण, अलिबाग, कर्जत या १५ तालुक्यांपैकी सुधागड तालुक्यातील सर्व सात-बारा डिजिटल स्वाक्षरी डेटाबेस्ड (डीएसडी) झाला आहे. जुलै २०१९ मध्ये तालुक्याचे काम रायगड जिल्ह्यात सातव्या क्रमांकाला होते. मात्र, ४ जानेवारी २०२० रोजी तालुक्यातील सात-बारा डिजिटल साइन करण्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. सुधागड तालुका डोंगर आणि घनदाट जंगलांनी घडला असून येथे लाइट जाणे ही मोठी समस्या आहे. तसेच खेडोपाड्यात नेटवर्क सुविधा नसतानाही सुधागड तालुक्यातील तलाठी व मंडळाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली, त्यामुळेच महाराष्ट्रात चौथा क्रमांक तर रायगड जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळाला आहे. सात-बारा डिजिटल साइन करण्यासाठी मेहनत घेतल्याने तालुक्यातील सर्व स्तरावर अभिनंदन केले जात आहे.
सात-बारा डिजिटल साइन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे, प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार, नायब तहसीलदार डी. एस. कोष्टी, नायब तहसीलदार वैशाली काकडे यांनी वेळोवेळी तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी एन.आय.सी. पुणे येथील हेल्थ डेस्क कृष्णा पास्ते तसेच रायगड जिल्हा मास्टर ट्रेनर शशिकांत सानप यांचे मोलाचे सहकार्य लाभले.संपूर्ण सुधागड तालुक्यात सात-बारा डिजिटल साइन करण्यात यश मिळाले आहे, त्यामुळे शेतकरी शासनाच्या वेबसाइटवरून कुठूनही ऑनलाइन सात-बारा दाखला काढू शकतात. - दिलीप रायन्नावार, तहसीलदार पाली, सुधागड