अलिबाग : रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी मुंबईतील बाल अस्थिरोगतज्ज्ञ (पेडीएट्रिक आॅर्थोपेडीक सर्जन) यांना येथे बोलावून येथील जिल्हा रुग्णालयातच बाल शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले होते. रविवारी शिवजयंतीचे औचित्य साधून आयोजित पहिल्या शिबिरात १० बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. शून्य ते अठरा वयोगटातील बालकांच्या शस्त्रक्रिया विशेषत: अस्थीविषयक शस्त्रक्रिया करण्याकरिता बाल अस्थिरोगतज्ज्ञ (पेडीएट्रिक आॅर्थोपेडीक सर्जन) आवश्यक असतात; परंतु ते सर्व जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असतात, असे नाही. परिणामी, अशा बालकांच्या पालकांना आपल्या मुलांच्या शस्त्रक्रिया करून घेण्याकरिता मुंबई-पुण्यात जावे लागते. त्यात त्या बालकास व त्यांच्या कुटुंबास होणारा त्रास आणि प्रसंगिक खर्च टाळण्याकरिता या शिबिरांचे आयोजन करण्याचे नियोजन केले असल्याचे डॉ. अजित गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राष्ट्रीय बाल आरोग्य अभियानांतर्गत या शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून, रविवारी झालेल्या पहिल्या बाल अस्थी शस्त्रक्रिया शिबिरात ज्येष्ठ पेडीएट्रिक आॅर्थोपेडीक सर्जन डॉ. संजय ओक व डॉ. हेमंत लाहोटी या मुंबईतील सर्जनसह भूलतज्ज्ञ डॉ. एस. एस. अंभोरे, डॉ. मकरंद पाटील, डॉ. ए. आर. रेड्डी, डॉ. ए. के. बारापल्ली, डॉ. प्राजक्ता वरसोलकर, डॉ. के. बी. माने, डॉ. संदेश म्हात्रे, डॉ. अनिकेत म्हात्रे, डॉ. राजाराम हुलवान, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल फुटाणे, डॉ. सुचेता गवळी आदी सहभागी झाले होते. त्यांच्या माध्यमातून पेण(३), रोहा (२) आणि म्हसळा, कर्जत, पनवेल, श्रीवर्धन व अलिबाग येथील प्रत्येकी एक अशा एकूण १० बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. राष्ट्रीय बाल आरोग्य अभियानांतर्गत ही मोफत बाल अस्थी शस्त्रक्रिया शिबिरे दर महिन्यात दोन वेळा होणार आहेत. या शिबिराचा लाभ घेण्याकरिता रायगड जिल्ह्यातील अस्थी आजारग्रस्त बालकांच्या पालकांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी वा राष्ट्रीय बाल आरोग्य अभियान समन्वयक सुनील चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ.गवळी यांनी केले आहे.
मोफत १० शस्त्रक्रिया यशस्वी
By admin | Published: February 21, 2017 6:10 AM