पोलीस भरतीला येणाऱ्या महिला उमेदवारांना निःशुल्क, सशुल्क कमी दरात राहण्याची सुविधा
By राजेश भोस्तेकर | Published: January 18, 2023 12:41 PM2023-01-18T12:41:11+5:302023-01-18T12:43:48+5:30
रायगड पोलीस दलात २७२ जागांसाठी एकोणीस हजार उमेदवारांनी पोलीस शिपाई पदासाठी अर्ज केले होते.
अलिबाग : रायगड जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई भरती सुरू आहे. ३ ते १८ जानेवारी कालावधीत पुरुष उमेदवाराची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर १९ ते २१ जानेवारी रोजी असे तीन दिवस महिला उमेदवाराची भरती प्रक्रिया होणार आहे. पोलीस प्रशासनातर्फे भरती साठी येणाऱ्या महिला उमेदवारासाठी निःशुल्क आणि कमी दरात सशुल्क निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तरी या सुविधेचा लाभ भरती साठी येणाऱ्या महिला उमेदवारांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.
रायगड पोलीस दलात २७२ जागांसाठी एकोणीस हजार उमेदवारांनी पोलीस शिपाई पदासाठी अर्ज केले होते. ३ जानेवारी रोजी वाहन चालक पदासाठी भरती प्रक्रिया पार पडली. ४ ते १८ जानेवारी दरम्यान पुरुष उमेदवाराची प्रक्रिया घेण्यात आली. १९ जानेवारी पासून महिला उमेदवाराची मैदानी चाचणी सुरू होणार आहे. २१ जानेवारी पर्यंत ही प्रक्रिया होणार आहे. यासाठी पोलीस मुख्यालय परेड मैदानावर मैदानी चाचणी होणार आहे.
पोलीस भरतीसाठी येणाऱ्या जिल्ह्यातून तसेच इतर जिल्ह्यातून येणाऱ्यामहिला उमेदवार यांना राहण्याची अडचण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने उपाययोजना केली आहे. अलिबाग वरसोली येथील विठ्ठल रखुमाई मंदिर हॉलमध्ये २५० जणांना मोफत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अलिबाग वरसोली येथील मयूर कॉटेज मध्ये ६० व्यक्तींना, आर्या कॉटेज, गुरुजी हॉटेल मध्ये ३०, कल्पवृक्ष रिसॉर्ट, म्हात्रे वाडी, श्री समर्थ कॉटेज वरसोली येथे ४० व्यक्ती साठी प्रत्येकी २०० रुपये या कमी दरात राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मदतीकरिता अलिबाग पोलीस, नियंत्रण कक्ष, तसेच कर्मचाऱ्यांकडे संपर्क करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.