नागरिक धास्तावले : महाड शहरात मगरींचा मुक्तसंचार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 01:54 AM2019-07-31T01:54:17+5:302019-07-31T01:54:53+5:30
नागरिक धास्तावले : सावित्रीच्या पुरामुळे मगर रस्त्यावर, व्हिडीओ व्हायरल
बिरवाडी : रायगड जिल्ह्यातील महाडच्या सावित्री नदीच्या पात्रात मगरींचा मुक्तसंचार कायम दिसून येतो. मात्र, नदीतील मगरींपासून आतापर्यंत कोणालाच धोका निर्माण झाला नाही. आतापर्यंत मगरींनी कोणावरही थेट हल्ला केल्याचे उदाहरण नाही. तरीही काही मासेमारी करणारे, मगरींच्या क्षेत्रात गेले असता जखमी केल्याचे सांगतात, त्यामुळे सावित्री, महाडकर आणि मगरी यांचे एक अनोखे नाते सर्वदूर परिचित झाल्याचे बोलावे लागेल तर याच मगरींनी महाडच्या रस्त्यावर अचानक पेट्रोलिंग केल्याचे समोर आल्याने महाडकरांची एकच धावपळ उडाली.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात सावित्री नदीतील अनेक मगर पुराच्या पाण्यासोबत रस्त्यावर आल्या आणि सर्वांचीच एकच धावपळ उडाली. महाड व परिसरात पुराचे पाणी येऊन गेल्यावर पाण्यासोबत आलेल्या मगरी भरवस्तीत दिसून आल्या. मगरी खुल्या रस्त्यावर फिरत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यातून सध्या महाड शहरात मगरींचीच चर्चा सुरू आहे. रस्त्यावर बिनधास्त फिरणाऱ्या महाकाय मगरींमुळे महाडकरांमध्ये भीती निर्माण झाली. महाड शहरातील गांधारी पूल व दस्तुरी परिसरात रस्त्यावर मगरी दिसल्याने अनेकांची पाचावर धारण झाली. अशात नागरिकांनी मगरीजवळ जाऊ नये, असे आवाहन वनविभाग व प्राणिमित्रांनी केले. दरम्यान, मगरी पुन्हा आपल्या जागी जातील, त्यामुळे नागरिकांनी घाबरू नयेत, असे आवाहन प्राणिमित्रांनी केले. तर काहींना भररस्त्यात मगरी दिसल्याने भीती व कुतुहलता जाणवल्याचे अनेकांनी प्रत्यक्ष भेटीअंती बोलताना स्पष्ट केले.