मुंबई : रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री उशिरा दरड कोसळल्याची दुर्देवी घटना घडली. या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून एकूण आतापर्यंत ५० हून अधिक लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर २१ जण जखमी आहेत. या गावातील लोकसंख्या २२८ असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे पॅकेट वाटप करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केला आहे.
इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयातील दालनात अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली आणि तातडीने मदत पुरविण्याचे आदेश दिले. इर्शाळवाडीच्या आजूबाजूच्या शिवभोजन केंद्रावरून हे पॅकेट देण्यात येणार आहे. शिवाय ५ लिटर रॉकेल, १० किलो तांदूळ, १० किलो गहू किंवा त्याचे पीठ, तूरडाळ, तेल, साखर देखील देण्यात येणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले आहे. जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत हा पुरवठा सुरूच राहणार असल्याचे सांगता छगन भुजबळ यांनी रायगड जिल्हाधिकारी यांना तातडीने याबाबतचे आदेश दिले आहेत.
दुसरीकडे, इर्शाळवाडीमध्ये घडलेल्या दुर्घटनेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियंत्रण कक्षातून आढावा घेतला आहे. हेलिकॉप्टर तयार आहे, पण खराब वातावरणामुळे तिथे ते उतरु किंवा थांबू शकत नाही. त्यामुळे हाताने बचावकार्य करण्याशिवाय पर्याय नाही, असे अजित पवार म्हणाले. तसेच मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. पनवेल, रायगडमधील प्रशासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. तर जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च हा सरकार करणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले आहे.
बचावकार्य युद्धपातळीवरमध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. बचावासाठी अग्नीशमन दल, पोलीस, एनडीआरएफच्या दोन टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, पावसामुळे इर्शाळगडाच्या पायथ्याशी जाण्याचा रस्ता अत्यंत निसरडा झाल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत घटनास्थळी दाखल झाले होते. मुख्यमंत्री म्हणाले की, "रायगडमधील इर्शाळवाडीत जवळपास ४५ ते ४७ घरं आहेत. दरड कोसळल्यामुळे जवळपास १६ ते १७ घरं मलब्याखाली गाडली गेली आहेत. आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. एनडीआरएफ, टीडीआरएफ आणि स्थानिक रेस्क्यू टीम काम करत आहेत."