समग्र शिक्षा अंतर्गत 'मोफत पाठ्यपुस्तक' योजना!
By निखिल म्हात्रे | Published: May 15, 2024 07:47 PM2024-05-15T19:47:28+5:302024-05-15T19:48:21+5:30
पात्र शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन दिली जाणार
अलिबाग - जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका शाळा आणि खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये ज्या पालकांची मुले शिकत आहेत त्यांनी आपल्या पाल्यांची पुस्तके बाजारातून खरेदी करु नयेत. ही पाठ्यपुस्तके सर्व पात्र शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी उपलब्ध करुन दिली जातील, असे असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांनी केले आहे.
समग्र शिक्षा अंतर्गत इ. 01 ली ते इ. 08 वी मध्ये शिकणारे कोणतेही बालक पुस्तकांपासून वंचित राहू नये आणि त्याला पाठ्यपुस्तका अभावी शिक्षणात अडथळा येवू नये, शाळेतील सर्व दाखलपात्र मुलांची 100 टक्के उपस्थिती टिकविणे,गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे यासाठी शासनाने समग्र शिक्षा अंतर्गत "मोफत पाठ्यपुस्तक" ही योजना सुरु केली आहे. इ.01 ली ते इ. 08 वीच्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या 01 लाख 84 हजार 162 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके (एकात्मिक पुस्तक संच) शासनामार्फत मोफत पुरविण्यात येणार आहेत.