मुरूडमध्ये शाळेतील मोफत प्रवेशाबाबत प्रशिक्षण शिबिर
By admin | Published: January 22, 2017 03:08 AM2017-01-22T03:08:52+5:302017-01-22T03:08:52+5:30
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणांचा अधिकार अधिनियमनुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांसाठी शाळेतील प्रवेश प्रक्रियेमध्ये २५ टक्के आरक्षण ठेवणे बंधनकारक आहे.
आगरदांडा : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणांचा अधिकार अधिनियमनुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांसाठी शाळेतील प्रवेश प्रक्रियेमध्ये २५ टक्के आरक्षण ठेवणे बंधनकारक आहे. दुर्बल व वंचित घटकांतील बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी मुरूड तालुक्यातील अनुदानित कायम विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या मुख्याध्यापकांना व संबंधित कर्मचाऱ्यांना आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत व सर्व नियमांबाबत रोहा येथील प्रशिक्षक-निखिल तांबोळी यांनी मार्गदर्शन केले.
मुरूड येथील कार्यशाळेत उपस्थित असलेले जिल्हा परिषद उपशिक्षण अधिकारी तथा मुरूड गटशिक्षण अधिकारी सुनील गवळी यांनी तालुक्यातील शाळांना नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या. सर्व शाळांनी २५ टक्के आॅनलाइन प्रवेश प्रक्रियाबाबत शाळेबाहेर भित्तीपत्रके लावण्याचे आदेश देण्यात आले. पालकांनी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी ५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत प्रवेशप्रकिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या संदर्भात शाळांनी जास्तीत जास्त जनजागृती करून दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना जास्तीत जास्त लाभ मिळावा, यासंदर्भात मार्गदर्शन केले.
जिल्हा परिषद उपशिक्षण अधिकारी तथा गटशिक्षणअधिकारी सुनील गवळी, तालुक्यातील सर्व मुख्याध्यापिका, संबंधित कर्मचारी व आदी मान्यवर उपस्थित होते.