महाराजांच्या रायगड किल्ला संवर्धनाचा मार्ग मोकळा!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 08:31 PM2018-04-09T20:31:56+5:302018-04-09T23:01:39+5:30
राज्याचा पुरातत्व विभागासोबत करार
नवी दिल्ली : महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ऐतिहासिक रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य शासनाकडून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागासोबत लवकरच सामंजस्य करार करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
राज्यातील विविध प्रकल्पांसंदर्भात आज मुख्यमंत्र्यांची प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्या सोबत बैठक झाली. यावेळी रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा खासदार संभाजी राजे भोसले, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या महासंचालक उषा शर्मा, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यावेळी उपस्थित होते.
या बैठकीनंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले, आजच्या बैठकीत प्रामुख्याने रायगड किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी राज्य शासन करीत असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. या कामांसाठी राज्याकडून 606 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांचे एक पथक तयार केले आहे. या कामाला गती देण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे काही अधिकारी प्रतिनियुक्तीवर राज्य शासनात द्यावेत, या राज्याच्या विनंतीस मान्यता देण्यात आली. यासंदर्भात राज्य शासन व भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण यांच्या दरम्यान लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. यानुसार भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे गतीने कार्य करण्यात येईल. तसेच, या अधिकाऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने आवश्यक अधिकारी व सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. यामुळे रायगड संवर्धनाच्या कार्यास गती प्राप्त होईल, असा विश्वासही श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.