फौजी आंबवडे विकासापासून वंचित, शासनाची निष्क्रियता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 01:28 AM2018-01-16T01:28:51+5:302018-01-16T01:28:54+5:30
पहिल्या आणि दुस-या महायुद्धासह आजपर्यंतच्या महत्त्वाच्या सर्व युद्धांमध्ये महाड तालुक्यातील फौजी आंबवडे गावातील अनेक जवानांनी शौर्य गाजवले आहे.
संदीप जाधव
अलिबाग : पहिल्या आणि दुस-या महायुद्धासह आजपर्यंतच्या महत्त्वाच्या सर्व युद्धांमध्ये महाड तालुक्यातील फौजी आंबवडे गावातील अनेक जवानांनी शौर्य गाजवले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच या गावाला लाभलेल्या सैनिकी पार्श्वभूमीमुळे हे गाव फौजींचे गाव अर्थात ‘फौजी आंबवडे’ म्हणूनच ओळखले जाते. गावातील प्रत्येक घरातील किमान एक तरुण आजही भारतीय सैन्य दलात भारतमातेच्या सेवेत आहे. असे असले तरी हे गाव मात्र विकासापासून नव्हे तर मूलभूत सुविधांपासून वंचित राहिले आहे.
महाडपासून २0 किमी अंतरावर वसलेल्या फौजी आंबवडे गावात २३ वाड्या आणि १२ कोंडांचा समावेश आहे. सुमारे ६५0 उंबरठ्याच्या गावची लोकसंख्या सुमारे चार हजार आहे. वेगवेगळ्या युध्दांमध्ये सहभागी झालेले सुमारे अडीचशे माजी सैनिक सध्या या गावात राहतात, तर गावातील तीनशेहून अधिक तरुण सध्याच्या घडीला लष्करी सेवेत कार्यरत आहेत.
पहिल्या महायुद्धात (१९१४-१९१९) या गावातील १११ जवानांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी सहा जवानांना युद्धात वीरगती प्राप्त झाली होती. या सहा शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तत्कालीन ब्रिटिश सरकारने गावात उभारलेला स्मृतिस्तंभ आजही जवानांच्या शौर्याची साक्ष देत आहे. १९६४-६५ च्या भारत- पाकिस्तान युद्धातही गावातील अनेक सुपुत्रांनी मर्दुमकी गाजवली. या भारत-पाक युद्धात २२ नोव्हेंबर १९६४ रोजी आंबवडे गावातील सुभेदार रघुनाथ गणपत पवार यांना वीरमरण आले तर लेह लडाख येथे २००३ मध्ये झालेल्या भारत-पाक चकमकीत याच गावातील मनोज रामचंद्र पवार हे शहीद झाले.
भारतीय सैन्यात अगदी शिपायापासून ते कॅप्टन पदापर्यंत गावातील अनेक जवानांनी पदे भूषवताना गावाचे नाव उज्ज्वल केले असले तरी देशसंरक्षणासाठी महत्त्वाची कामगिरी बजावणाºया फौजी आंबवडे गावच्या विकासाची पाटी मात्र आजही कोरीच आहे. रस्ता, पाणी, आरोग्य, दळणवळण या मूलभूत सुविधा अद्याप गावापासून कौसो मैल दूर आहेत. शासनाच्या निष्क्रियतेबाबत गावातील निवृत्त सैनिकांच्या भावना मात्र तीव्र आहेत. आयुष्यभर लष्कराच्या शिस्तीत राहिलेल्या माजी सैनिकांना इतरांप्रमाणे आंदोलन करावे हे बेशिस्तीचे वाटते, परिणामी शासकीय विकास येथे पोहचत नाही.
आजही गावातील वाड्यांना जोडणारे रस्ते अस्तित्वातच नाहीत, तर साकव (छोटे पूल) नसल्यामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांना तीन-तीन किमीचा वळसा मारून पायपीट करावी लागते. या गावातील पाणीपुरवठा योजना चाळीस वर्षांपूर्वीची असून दोन विहिरींपैकी एक विहीर पूर्ण जमीनदोस्त झाली आहे, तर दुसरी विहीर मोडकळीस आल्याने जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. ही विहीर जमीनदोस्त झाल्यास येत्या काळात गावची पाणीपुरवठा योजना संकटात येऊन गावाला भीषण पाणीटंचाईशी सामना करावा लागेल, अशी भीती निवृत्त कॅप्टन संजय पवार यांनी व्यक्त केली.
आरोग्य उपकेंद्र गावात असले तरी ते कायमच बंद असते. सरकारी वैद्यकीय अधिकारी येथे कधी फिरकत देखील नाहीत. गावातील सुमारे शंभरहून अधिक विद्यार्थी महाड शहरात महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. मात्र एसटी बस कधीच वेळेवर नसल्याने आणि अनेकदा बस फेºया रद्द केल्या जात असल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते. वारंवार महाड आगारात याबाबत तक्र ारी करूनही कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही, त्याबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. गावातील निवृत्त कॅ.संजय पवार, निवृत्त कॅ. विठोबा पवार, निवृत्त कॅ. दिनकर अहिरे, निवृत्त कॅ. विजय जाधव, निवृत्त कॅ. बाबूराव जाधव,निवृत्त कॅ. सोनू जाधव,निवृत्त कॅ. सदाशिव पवार, सुभेदार श्रीराम पवार, संतोष पवार, सचिन पवार आदी ग्रामस्थांनी शासनाने फौजी आंबवडे गावाला विकासासाठी विशेष अनुदान द्यावे, अशी आग्रही मागणी ‘लोकमत’च्या माध्यमातून शासनाकडे केली आहे.
पहिल्या महायुद्धास १०० वर्षे, शहिदांचे यथोचित स्मारक व्हावे
१देशसेवेसाठी वीरगती प्राप्त झालेल्या फौजी आंबवडेमधील शहिदांच्या स्मृती सतत जागृत राहाव्यात यासाठी शासनाने ‘शहीद स्मारक’ गावात उभारावे, अशी मागणी गावच्या सरपंच नेहा चव्हाण यांनी केली.
२पुढील वर्षी पहिल्या महायुद्धाला १00 वर्षे पूर्ण होत आहेत, या पार्श्वभूमीवर शहीद स्मारक उभारणीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी सरपंच चव्हाण यांनी केली.
३पहिल्या महायुद्धाला पुढील वर्षी १00 वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांचा स्मृतिदिन आंबवडे येथे शासनाने आयोजित करावा, अशी मागणी दीड वर्षापूर्वी येथील सैनिक मंडळातर्फे रायगड जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्याची साधी दखल देखील घेतली नाही.
४फौजी आंबवडेवासीयांच्या आयुष्यात पहिल्या महायुद्धाच्या शंभराव्या स्मृतिदिनाचे महत्त्व अनन्य साधारण आहे आणि म्हणूनच हा शंभरावा स्मृतिदिन आंबवडे गावात साजरा करावा, अशी अपेक्षा निवृत्त कॅप्टन सखाराम पवार यांनी व्यक्त केली.
१५ जानेवारी १९४९ या दिवशी तत्कालीन ब्रिटिश कमांडर इन चीफ सर एफ. आर. आर. ब्रुचर यांच्याकडून जनरल के.एम. करीअप्पा यांनी भारतीय लष्कराची सूत्रे स्वीकारली. त्या दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी १५ जानेवारी हा दिवस ‘लष्कर दिन’ म्हणून देशभरात पाळण्यात येतो. याच दिवसाचे औचित्य साधून सैनिकांचे गाव म्हणून पहिल्या महायुध्दापासून नावलौकिक संपादन केलेल्या आणि आजही ‘घरटी एक तरुण भारतीय लष्करात’ अशी शौर्य परंपरा आबाधित राखणाºया महाड तालुक्यातील ‘फौजी आंबवडे’ गावातील शासकीय निष्क्रियतेचा घेतलेला वेध...
कोट्यवधी रुपये पाण्यात
थेंबभरही पाणी नाही अडले
शासकीय पाणलोट योजनेतून गावाकरिता चार बंधारे बांधण्यात आले. पण अत्यंत निकृष्ट दर्जाच्या बांधकामांमुळे बंधाºयांवर झालेला कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेला, मात्र पाणी कधीही अडले नाही.
आंबवडे फाट्यापासूनचा रस्ता २००८ मध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आला. मात्र सध्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधींचे तसेच शासनाचे देखील या मुख्य समस्यांकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याची परिस्थिती २२ वर्षे सरपंचपद भूषवलेले वासुदेव पवार यांनी लक्षात आणून दिली.
सातारा जिल्ह्यातील फौजी गावांमध्ये शासनाने विशेष सोयी-सुविधा दिल्या आहेत, त्या तुलनेत फौजी आंबवडे गावाचा दहा टक्के देखील विकास झाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.