लोकमत न्यूज नेटवर्क पाली : सुधागड तालुक्यातील बलाप येथे भाजीपाला व कलिंगड विक्री केंद्राचे उद्घाटन पंचायत समिती पाली-सुधागड सभापती रमेश सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रावर शेतातील ताजा भाजीपाला व कलिंगड शेताजवळच मिळणार आहे
'विकेल ते पिकेल' या संकल्पनेवर आधारित संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान राज्यात राबविण्याबाबत धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्या अंतर्गत हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या विक्री केंद्रावर शेतकरी धर्मा हंबीर, उमाजी हंबीर व रमेश हंबीर यांच्या शेतातील भाजीपाला विक्रीस उपलब्ध होणार आहे, तसेच राजेंद्र खरिवले यांच्याकडील कलिंगडदेखील विक्रीस उपलब्ध होणार आहेत. हे विक्री केंद्र भाजीपाला लागवड क्षेत्राशेजारी असल्याने ग्राहकांना शेतातील ताजी भाजी व कलिंगड रोज उपलब्ध होणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्राजक्ता पाटील यांनी केले. या कार्यक्रमास पंचायत समिती सभापती रमेश सुतार, तालुका कृषी अधिकारी जे. बी. झगडे, कृषी अधिकारी चौधरी, कृषी अधिकारी बी. सी. वाळके, मंडळ कृषी अधिकारी व्ही. एल. माने, कुंभारशेत सरपंच सुनील ठोंबरे, उपसरपंच किशोर खरीवले, माजी सरपंच दिलीप खरीवले, संदीप खरीवले, तालुका कृषी कार्यालयातील कृषी सहायक व इतर शेतकरी उपस्थित होते.
'विकेल ते पिकेल' बाबत मार्गदर्शन nयावेळी तालुका कृषी अधिकारी जे. बी. झगडे यांनी 'विकेल ते पिकेल' संकल्पनेबाबत मार्गदर्शन केले. तालुक्यात अशा प्रकारची विक्री केंद्र सुरू करण्याचे नियोजन असून, लवकरच इतरही ठिकाणी भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.