५ जुलैपासून शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम, शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न

By निखिल म्हात्रे | Published: June 19, 2024 04:48 PM2024-06-19T16:48:51+5:302024-06-19T16:49:32+5:30

शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची विशेष शोधमोहीम ५ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. ती २० जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.

From 5th July, the search for out-of-school children, efforts by the government to bring education into the flow | ५ जुलैपासून शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम, शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न

५ जुलैपासून शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम, शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ३ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची विशेष शोधमोहीम ५ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. ती २० जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.

रायगड जिल्ह्यात प्राथमिक समग्र शिक्षा कार्यक्रमाची तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रअंतर्गत ज्ञानरचनावादी शाळा, कृतियुक्त अध्ययन पद्धती, डिजिटल शाळा, मोफत पाठ्यपुस्तक, मोफत गणवेश, मध्यान्ह भोजन, विविध शिष्यवृत्ती परीक्षा तयारी, नवोदय परीक्षा तयारी अशा प्रभावी उपक्रमांची अंमलबजावणी अनुभवी व तज्ज शिक्षकांमार्फत शाळांमध्ये सुरू आहे. मात्र, शासनाच्या अनेक योजना सुरू असतानाही अद्याप काही बालके शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

अशी आहे मोहीम

मोहिमेनुसार घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याव्यतिरिक्त बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारपेठ, वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने, स्थलांतरित कुटुंबे, जिल्ह्यातील सर्व खेडी, गाव, वाडी, तांडे, पाडे, शेतमळे, जंगल, बालगृह, निरीक्षणगृह, विशेष दत्तक संस्था, आदी ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांच्या नोंदी करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षण विभागाचे आवाहन काय?

शाळाबाह्य मुलांच्या विशेष शोधमोहीम अंतर्गत ३ ते ६ वयोगटातील जी बालके एकात्मिक बालविकास योजनेचा लाभ घेत नाहीत; तसेच खासगी बालवाडी, इंग्रजी माध्यमांचे ज्युनिअर केजी, सीनिअर केजीमध्ये जात नाहीत व ६ ते १८ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य बालके यांची शोधमोहीहिम घेण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी केले आहे.

Web Title: From 5th July, the search for out-of-school children, efforts by the government to bring education into the flow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.