१ सप्टेंबरपासून रेवस-भाऊचा धक्का प्रवासी बोट सेवा सुरू; १०० रुपयांत करा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 08:07 PM2023-08-23T20:07:33+5:302023-08-23T20:07:43+5:30
भाऊचा धक्का -मोरा मार्गावरील तिकिट दर २५ रुपयांनी कमी होणार : ऐन गणपती सणातच अलिबाग-कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा
मधुकर ठाकूर
उरण : मागील तीन महिने पावसाळी हंगामात बंद करण्यात आलेली रेवस - भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावर १ सप्टेंबर पासून प्रवासी बोट सेवा पुर्ववत सुरू होणार आहे.तर भाऊचा धक्का - मोरा दरम्यान पावसाळी हंगामात वाढविण्यात आलेला तिकिट दर २५ रुपयांनी कमी होणार आहे.यामुळे ऐन गणपती सणातच सुरू होणाऱ्या प्रवासी वाहतूकमुळे अलिबाग-कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांची गैरसोय दूर होणार आहे. तसेच मोरा सागरी प्रवासही स्वस्त होणार असल्याने प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.
वारंवार बदलणारे वादळी व खराब, मुसळधार पाऊस, हवामान समुद्रात उठणाऱ्या उंचच उंच लाटा यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून पावसाळी हंगामासाठी दरवर्षी रेवस - भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येते. या सागरी मार्गावरील तिकिट दर १०० रुपये आहे.तर गेटवे -मांडवा मार्गावरील स्पीडबोट आणि रो-रो बोटसेवा यांच्या तिकिट दरांपेक्षा सर्वसामान्यांना रेवस - भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावरील प्रवास परवडतो.त्यामुळे हजारो सर्वसामान्य प्रवासी या मार्गावरुन प्रवास करतात.
मात्र जुन ते ३१ ऑगस्ट दरम्यान तीन महिन्यांसाठी या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतुक बंद ठेवण्यात आलेली प्रवासी बोट सेवा १ सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सेक्रेटरी शराफत मुकादम यांनी दिली.ऐन गणपती सणातच १ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या रेवस - भाऊचा धक्का दरम्यानच्या प्रवासी लॉचेसमुळे अलिबाग -कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांची गैरसोय दूर होणार आहे. तर भाऊचा धक्का -मोरा दरम्यान दरवर्षी पावसाळी हंगामात तिकिट दरात वाढ केली जाते.त्यामुळे पावसाळी हंगामात भाऊचा धक्का -मोरा दरम्यान तिकिट दरात २५ रुपयांची वाढ करण्यात आली होती.
१ सप्टेंबर पासून पावसाळी हंगाम संपुष्टात येणार असल्याने तिकिट दरात करण्यात आलेली २५ रुपयांची वाढ कमी करण्यात येणार आहे.यामुळे भाऊचा धक्का -मोरा दरम्यान प्रवाशांना तिकिटासाठी आता ८० रुपये मोजावे लागणार असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सेक्रेटरी शराफत मुकादम यांनी दिली.यामुळे या सागरी मार्गावरील प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.