महाव्यवस्थापकांपुढे प्रवाशांनी मांडले गाऱ्हाणे
By admin | Published: February 13, 2017 05:11 AM2017-02-13T05:11:30+5:302017-02-13T05:11:30+5:30
रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी अधिकाऱ्यांसह कर्जत रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी केली.
कर्जत : रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी अधिकाऱ्यांसह कर्जत रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपस्थित कर्जतकरांनी त्यांना मागण्यांची निवेदने दिली. यावेळी कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या समस्या ऐकून घेऊन शक्य त्या समस्या लवकरात लवकर दूर करण्याचे आश्वासन दिले.
रविवारी दुपारी २च्या सुमारास मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक कर्जत रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी करणार असल्याचे कर्जतकर प्रवाशांना समजल्याने त्यांनी दुपारी १.३० वाजताच कर्जत रेल्वे स्थानकात गर्दी केली. मात्र, तब्बल अडीच तास उशिरा महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल व त्यांची पूर्ण टीम विशेष गाडीने कर्जत रेल्वे स्थानकात उतरली. कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुरेश खानविलकर, माजी अध्यक्ष प्रभाकर करंजकर,कार्याध्यक्ष केतन शहा, उपाध्यक्ष नगरसेवक मुकेश पाटील, पंकज ओसवाल, गोपीनाथ ओसवाल आदींनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर शर्मा यांच्या हस्ते चालक दालनाचे व एलईडी लाइटचे उद्घाटन केले. त्यानंतर कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने आपल्या मागण्यांचे निवेदन शर्मा यांना दिले. निवेदनामध्ये पुणे- एर्नाकुलम, पुणे-नांदेड, बिदर-कुर्ला, नांदेड-कुर्ला, पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस, नागरकोयल-मुंबई, हुबळी-कुर्ला या गाड्या कर्जत स्थानकावर थांबत नाहीत, त्यांना कर्जतला थांबा द्यावा. तसेच कर्जतहून पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या प्रत्येक गाडीला अधिकृत थांबा द्यावा. चार वर्षांपासून रखडलेले पुणे एंडकडील मुंबई एंडकडे उतरण्याच्या जिन्याचे काम करावे. कर्जत-लोणावळा व कर्जत-पनवेल शटलसेवा सुरू करावी. रेल्वेचे आरक्षण माहिती मिळणारे पीओईटी मशिन गेल्या पाच वर्षांपासून दुरु स्तीला दिले आहे, ते लवकर पुन्हा रेल्वे स्थानकात बसवावे. सरकता जिना करावा आदी मागण्यांचा समावेश आहे. (वार्ताहर)