आविष्कार देसाईअलिबाग : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकांनंतर आता जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींसाठी २३ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. आठ ग्रामपंचायतींपैकी चेंढरे ग्रामपंचायतीवर विशेष करून सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. या ठिकाणी शेकापची सत्ता उलटून टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना यांच्यासह अन्य पक्ष एकत्र येत आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये चांगलीच राजकीय चुरस अनुभवास मिळणार आहे.
२३ जून रोजी अलिबाग तालुक्यातील चेंढरे आणि वरसोली ग्रामपंचायत, पेण तालुक्यातील रावे, पनवेल तालुक्यातील चावणे, जांभिवली, कराडे खुर्द ग्रामपंचायत, उरण तालुक्यातील गोवठणे, आवरे ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे; परंतु चेंढरे ग्रामपंचायतीमधील सत्ताबदलासाठी घडणाºया घडामोडींमुळे या ग्रामपंचायतीमधील लढत राजकीय पटलावर उल्लेखनीय ठरणार असल्याचे दिसून येते.
१९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर २००४ साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विद्यमान सदस्य दत्ता ढवळे यांनी आघाडीसाठी प्रयत्न केले. त्यांना काँग्रेस, शिवसेनेनेही मदत करत हे राजकीय पक्ष आघाडीमध्ये सामील झाले होते, त्यामुळे आघाडीची सत्ता आली होती. त्या वेळी प्रभारी सरपंच म्हणून ढवळे यांनी काम केले होते. त्यानंतर २००९ साली आघाडीत बिघाडी झाल्याने यशाने हुलकावणी दिल्याने २०१४ च्या निवडणुकीत सर्वपक्षीय विरुद्ध शेकाप अशी पुन्हा महाआघाडी झाली; परंतु यश आघाडीच्या दृष्टिपथात आले नाही. आता पुन्हा २०१९ साली आघाडीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. शिवसेनेचे महेंद्र दळवी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड. जे. टी. पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता ढवळे आघाडी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याबाबतच्या काही बैठका पार पडल्या आहेत. आघाडी करण्यावर एकवाक्यता झाली आहे. शेकापला रोखायचे असेल तर आघाडी होणे ही काळाची गरज असल्याचे मत शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सरपंचपद हे खुल्या प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव आहे. थेट सरपंच निवडून द्यायचा असल्याने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता ढवळे यांच्या पत्नी प्रिया ढवळे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जाते. सुरुवातीच्या बैठकींमध्ये काँग्रेस इच्छुक असल्याचे चित्र होते. मात्र, काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही प्रिया ढवळे यांच्या नावाला विरोध केला नाही, तसेच शिवसेनेचे महेंद्र दळवी यांनीही प्रिया ढवळे यांच्या नावाला पसंती दिली आहे, असे स्वत: दळवी यांनीच स्पष्ट केले. शुक्रवारी होणाºया सर्वपक्षीय बैठकीमध्ये प्रिया ढवळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सुरुवातीपासूनच दत्ता ढवळे यांनी शेकाप विरोधात कडवी झुंज दिली आहे. मध्यंतरी शेकाप-राष्ट्रवादी यांच्या समझोत्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना राजकारण करणे कठीण झाले होते, हे काही लपलेले नाही.
२००९ ते २०१४ आणि २०१४ ते २०१९ अशी सलग दहा वर्षे शेकापची सत्ता आहे. सत्तेमध्ये असताना शेकापने म्हणावा तसा विकास केला नसल्याचा आरोप दत्ता ढवळे यांनी करून जनतेच्या विकासासाठीच शेकापविरोधात सर्वपक्षीय आघाडीचा निर्णय घेतल्याचे ढवळे यांनी स्पष्ट केले. आघाडी करून लढल्यावरच विजयश्री खेचून आणता येणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. काँग्रेसनेही प्रिया ढवळे यांच्या नावाला विरोध केलेला नाही, असे काँग्रेसचे पदाधिकारी मिलिंद नाईक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
गेल्या दहा वर्षांत शेकापने चेंढरे ग्रामपंचायतीमध्ये विकास केला आहे. त्यामुळे कितीतरी आघाडी, युती विरोधात उभ्या राहिल्या तरी जनता आमच्याच पाठीशी उभी राहील, असे शेकापचे नेते संजय पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सर्वपक्षीय बैठक रात्री उशिरा सुरू होणार आहे. त्या बैठकीला शिवसेनेचे महेंद्र दळवी, दीपक रानवडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड. जे. टी. पाटील, काँग्रेसचे मिलिंद नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता ढवळे, तालुका उपाध्यक्ष सुनील गुरव, अलिबाग तालुका युवक अध्यक्ष मनोज शिर्के, संजय वानखेडे यांच्यासह अन्य महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.दरम्यान, भाजपची भूमिका जाणून घेण्यासाठी भाजपचे पदाधिकारी अॅड. महेश मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
नामनिर्देशनपत्रांचा ६ जूनपर्यंत स्वीकाररायगड जिल्ह्यामधील आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तसेच दहा ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाच्या पोटनिवडणुकांसाठी २३ जून २०१९ रोजी मतदान होणार आहे. जुलै २०१९ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत मुदत संपणाºया ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. सार्वत्रिकसह सर्व निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र ३१ मे २०१९ ते ६ जून २०१९ या कालावधीत स्वीकारली जातील. २ व ५ जून २०१९ या दोन सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारली जाणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी ७ जून २०१९ रोजी होईल. नामनिर्देशनपत्र १० जून २०१९ पर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचेही वाटप करण्यात येणार आहे. मतदान २३ जून २०१९ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी २४ जून २०१९ रोजी होईल.
दहा सरपंच व २६३ सदस्यांची होणार पोटनिवडणूक : रायगड जिल्ह्यातील मुरु ड सात, पेण २२, पनवेल १९, उरण, कर्जत, खालापूर प्रत्येकी पाच, रोहा आठ, सुधागड, माणगाव, तळा प्रत्येकी १७, महाड ६२, पोलादपूर २९, श्रीवर्धन २८, म्हसळा २२ अशा एकूण २६३ ग्रामपंचायतीच्या रिक्त सदस्यपदांची पोटनिवडणूक होणार आहे.