महाड : रायगड जिल्ह्यातील सर्व तीनचाकी आणि त्यापेक्षा मोठी वाहने पेण आरटीओ कार्यालयामध्येच पासिंगसाठी आणण्याची सक्ती करण्यात आली आहे. ही सक्ती मागे घेण्यात यावी आणि या सर्व वाहनांचे पासिंग पूर्वीप्रमाणेच तालुकास्तरावरील कँपमध्ये करण्यात यावे यासाठी महाड तालुक्यातील वाहतूकदारांच्या संघटनांनी मंगळवारी महाड येथील आरटीओ कँपवर मोर्चा नेला. या मोर्चानंतरही जर ही मागणी मान्य झाली नाही, तर या आंदोलनाचे लोण संपूर्ण जिल्हाभरात पसरेल आणि तालुकास्तरावरील आरटीओ कँपच बंद पाडण्यात येतील, असा इशारा महाड तालुका रिक्षा संघटनेचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी आरटीओला दिला आहे.मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता शिवाजी चौकातून या मोर्चाला प्ररंभ झाला. शिवाजी चौक, भगवानदास बेकरी, नवेनगर, महाड परिवहन स्थानक, महामार्गाने हा मोर्चा बुटाला हॉल येथील आरटीओ कँपच्या ठिकाणी नेण्यात आला. या ठिकाणी आरटीओ विभागाचे उपनिरीक्षक इनामदार यांना मोर्चेकºयांच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर करून त्यांच्याशी चर्चा केली.शिष्टमंडळाशी चर्चा करताना, आरटीओ अधिकारी इनामदार यांनी अडीचशे मीटर्सचा सरळ डांबरी रस्ता, पार्किंगची व्यवस्था असलेली जागा उपलब्ध झाल्यास त्या ठिकाणी न्यायालयाची परवानगी घेऊन वाहनांचे पासिंग करण्याची सुविधा आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो, असे स्पष्ट केले. त्यावर महाड एमआयडीसीमध्ये अशा प्रकारची जागा उपलब्ध असून, त्या जागांची पाहणी करून आरटीओ विभागाने असा प्रस्ताव सादर करावा, अशी भूमिका वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींनी घेतली. लवकरच याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन आरटीओ विभागाकडून देण्यात आले.महाड तालुका रिक्षा संघटनेचे अध्यक्ष रवींद्र पाटील, महाड पोलादपूर तालुका स्कूल बस संघटनेचे अध्यक्ष शशिकांत देशमुख, महाड एमआयडीसी ट्रक, टेंपो संघटनेचे अध्यक्ष शरद मांडे, महाड एमआयडीसी स्थानिक डंपर वाहतूक संघटनेचे अध्यक्ष गणपत निकम, महाड पोलादपूर तालुका विक्र म मिनीडोर संघटनेचे अध्यक्ष सुधाकर यादव यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. छावा संघटनेचे अध्यक्ष मुदिस्सर पटेल, महाड तालुका बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश मोरे यांनीही मोर्चाला पाठिंबा दिला.
वाहतूक संघटनांचा महाडमध्ये मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 6:44 AM