अलिबाग : केंद्र सरकारच्या कामगार विरोधी कायद्याच्या निषेधार्थ तसेच राज्य सरकारकडे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शुक्रवारी आरोग्य विभागातील कंत्राटी कामगार, सेविकांच्या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन रायगड जिल्हा परिषदेवर करण्यात आले होते. दोन्ही मोर्चांचे मोर्चाअंती रूपांतर धरणे आंदोलनात व जाहीर सभेत झाले.केंद्र सरकारने कामगार विरोधी धोरणे राबवायला सुरूवात केली आहे. तसेच कामगार विरोधी कायदा करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाचा प्रयत्न सुरू आहे. असे झाले तर देशातील कामगारवर्ग संपणार आहे. यामुळे मध्यवर्ती शासनाच्या कामगार विरोधी धोरणाचा जाहीर निषेध करण्यासाठी देशभरातील सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊ न या देशव्यापी संपाचा निर्णय घेतला आहे. या संपास अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांचा जाहीर पाठिंबा आहे. संपामध्ये अंगणवाडी कर्मचारी पूर्णपणे भागीदारी करणार आहेत. या संपाला अनुसरून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता रायगड जिल्हा परिषदेवर हा मोर्चा काढण्याचे अंगणवाडी कर्मचारी व संघटनेने ठरविले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांचे विविध प्रलंबित २० प्रश्न व मागण्यांच्या पूर्ततेकरिता या आंदोलनाचे आयोजन केल्याची माहिती अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका संघटनेच्या अध्यक्षा माया परमेश्वर यांनी दिली. यावेळी कामगार नेते श्याम म्हात्रे,अन्य पदाधिकारी देखील उपस्थित होते.अंगणवाडी सेविका संघटनेच्या वतीने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे यांना तर आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी सतीष बागल यांना निवेदन दिले.
कामगारविरोधी कायद्याच्या निषेधार्थ मोर्चा
By admin | Published: September 03, 2016 2:25 AM